पुण्यात नारायण पेठेत रुद्र सोसायटीतील इलेक्ट्रिक वाहनांना आग:सकाळी तळमजल्यावर धूर, अग्निशामक दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली

[ads1]


पुण्यातील नारायण पेठेत एका सोसायटीतील इलेक्ट्रिक दुचाकी आणि मोटारीला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. नारायण पेठ पोलीस चौकी परिसरातील रुद्र सोसायटीमध्ये ही घटना घडली. सकाळी सहाच्या सुमारास सोसायटीच्या आवारातील एका इलेक्ट्रिक दुचाकीला आणि एका मोटारीला भीषण आग लागली. आगीमुळे सोसायटीच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात धूर झाला. यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती आणि गोंधळ उडाला. कसबा पेठ अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पाण्याचा मारा करून आग विझवली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाने दिली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानाच्या सतर्कतेमुळे पुण्यात एका पीएमपीएमएल बसला लागलेल्या आगीमुळे होणारा मोठा अनर्थ टळला. कसबा अग्निशमन केंद्राचे जवान सुरेश पवार यांनी प्रसंगावधान राखत ही मोठी दुर्घटना टाळली. जवान सुरेश पवार हे रात्रीची ड्युटी संपवून काळेवाडीकडे दुचाकीवरून घरी जात होते. शिवाजीनगर चौकात पुणे स्टेशन ते निगडीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे त्यांना दिसले. पवार यांनी तात्काळ बस चालकाला थांबण्यास सांगितले आणि दलाच्या नियंत्रण कक्षात माहिती दिली. कसबा अग्निशमन वाहन येईपर्यंत चालक, वाहक आणि पवार यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले होते. अग्निशमन वाहन पोहोचताच जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून ती पूर्णपणे विझवली. अग्निशमन जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रवाशांनी अग्निशमन जवान आणि चालक-वाहक यांच्या तत्परतेचे कौतुक केले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *