[ads1]
![]()
“महालक्ष्मी कशाच्या पाऊलांनी आली, सोन्या-रुपयाच्या पाऊलांनी आली…’ असा जयघोष करत, टाळ-मृदंग आणि घंटानादाच्या गजरात शहर आणि परिसरात अनुराधा नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर घरोघरी ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे (महालक्ष्मी) सोनपावलांनी अत्यंत उत्साहात आगमन झाले आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीतच लाडक्या गौराईच्या स्वागतासाठी मनमाडकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, शहरातील कॉलनी तसेच मध्यवर्ती बाजारपेठ परिसरातील घराघरांत बाप्पाच्या पाठोपाठ माहेरवाशिणीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी सकाळपासूनच घरांची स्वच्छता करून मुख्य प्रवेशद्वारांवर आकर्षक रांगोळ्या आणि तोरणे लावून पूर्वतयारी केली होती. घरात आलेल्या पाहुण्याचे स्वागत करण्याच्या पारंपरिक रीतीनुसार गौराईचे लिंबलोण उतरवून स्वागत करण्यात आले. अनेक घरांमध्ये पारंपरिक मुखवटे, तर काही ठिकाणी उभ्या गौरींची स्थापना करून त्यांना नऊवारी साडी आणि दागिन्यांनी नटवण्यात आले आहे. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून, पारंपरिक गीते गात आणि झिम्मा-फुगडीसारखे खेळ खेळत हा आनंदोत्सव साजरा केला. गौरी आणल्यानंतर विधिवत पूजा करून विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी येणारा हा तीन दिवसांचा सण मोठा आनंदात साजरा केला जातो. गौरी एकटी येत नसून, त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. गौराई म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप असून, ती माहेरपणासाठी घरात येते, अशी पारंपरिक समजूत आहे. प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती, कुळधर्म- कुळाचार पाळून हे पूजन केले जाते; काही घरांमध्ये गणपती नसले तरी गौरींची स्थापना आवर्जून केली जाते. शुक्रवारी मुख्य पूजन; १९ सप्टेंबरला विसर्जन ज्येष्ठा नक्षत्रावर शुक्रवारी दुपारी महालक्ष्मीची मुख्य पूजा आणि महानैवेद्य अर्पण केला जाईल. या दिवशी अनेक घरांमध्ये पारंपरिक पुरणपोळी किंवा १६ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच संध्याकाळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. त्यानंतर शनिवारी (१९ सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर गौराईला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन केले जाणार आहे.
[ads2]
ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे स्वागत:नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिन्यांनी घराघरांमध्ये सजल्या महालक्ष्मी
















Leave a Reply