![]()
नातू आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी कुख्यात बंडू आंदेकर, त्यांची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. यानुसार, तिन्ही
.
न्यायालयाने उमेदवारी अर्ज भरताना कोणतीही मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक भाषणे करू नयेत, अशी ताकीद दिली आहे. निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, हे तत्त्व अधोरेखित करत न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज भरण्याची मुभा दिली. पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, तिघे रा. नाना पेठ) यांच्यासह एकूण पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
यातील बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराजची पत्नी सोनाली यांना निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण यांनी केली होती. नाना पेठ परिसरात आंदेकर कुटुंबीयांची मोठी दहशत मागील अनेक वर्षापासून पाहावयास मिळत आहे.
