[ads1]
![]()
बडनेरा जुनी वस्तीतील जयहिंद गणेशोत्सव मंडळाने यावर्षी ३१ किलो अंजीर आणि मखान्यापासून श्रींची मूर्ती साकारली आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि ‘जल है तो कल है’ चा संदेश देणारे देखावे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. हे मंडळ गेली ३८ वर्षे समाजसेवेचे व्रत जपून आहे. यावर्षी मंडळाच्या अध्यक्षपदी संकेत दारोकर, उपाध्यक्षपदी निकेश निचत, सचिवपदी प्रज्वल पोकळे आणि कोषाध्यक्ष म्हणून मयूर अंबाडकर यांची निवड झाली आहे. त्यांच्यासोबत अनेक सदस्य कार्यरत आहेत. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वर्षभर विविध समाजसेवा उपक्रमांमध्ये सहभागी असतात. यात रक्तदान शिबिर, वृद्ध नागरिकांसाठी नेत्र तपासणी व चष्मेवाटप, गरजू नागरिकांना मदत आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यांचा समावेश आहे. या कार्यासाठी मंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सन २०१६ मध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ६ फूट उंचीची ‘५१ किलो लाल सुपारीची गणेश मूर्ती’ साकारली होती. ‘जल है तो कल है’ या विषयावर आधारित देखावा तयार करून त्यांनी गणेशभक्तांना पाण्याची किंमत समजावून सांगितली. या प्रयत्नामुळे मंडळाला ‘लोकमान्य महोत्सव २०१६’ चा महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला. तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत हे पारितोषिक देण्यात आले होते. त्यानंतर २०२४ मध्ये ७५ किलो खारीक वापरून बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला अमरावती महापालिकेच्या ‘आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२५’ चा पुरस्कार मिळाला. तत्कालीन महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. गेल्या सात वर्षांपासून मंडळाला पोलिस आयुक्तालय आणि महापालिका आयुक्तांच्या आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक मिळत आहे, हे विशेष आहे. स्वकलेने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा इतिहास असलेल्या या मंडळाने यावर्षी ३१ किलोग्रॅम अंजीर आणि मखान्यापासून श्रींची मूर्ती बनवली आहे. गेल्यावर्षी तब्बल ७५ किलो खारीक वापरून श्रींची मूर्ती साकारण्यात आली होती. बाप्पांच्या धोतीला सजवण्यासाठी यावर्षी मखान्याचा वापर केला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही अनेक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. यात कापसाचा गणपती, भांड्यांचा गणपती, मडक्यांचा गणपती, टोपल्यांचा गणपती, चमकीचा गणपती, डिस्को मण्यांचा गणपती, सुकामेवा आणि उपवासाच्या पदार्थांचा गणपती, मोतींचा गणपती, पाच हजार चॉकलेटचा गणपती, २१ हजार पवित्र रुद्राक्षांचा गणपती आणि ५१ किलो समुद्री शिंपल्यांचे बाप्पा यांचा समावेश आहे.
[ads2]
बडनेरा जयहिंद मंडळाने अंजीर-मखान्यापासून साकारली गणेश मूर्ती:38 व्या वर्षात समाजसेवेचे व्रत, 'जल है तो कल है' चा संदेश
















Leave a Reply