[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४ हजार ७ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक सलोखा, एकोपा आणि गावातील तंटे-मतेभेद कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमालाही ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये १ हजार १५५ मंडळे शहरी भागात, तर २ हजार ८५२ मंडळे ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण भागातील ४९९ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना स्वीकारली आहे. या उपक्रमामुळे गावागावातील सामाजिक ऐक्य वाढण्यास तसेच अनावश्यक तंटे व मतभेद कमी करण्यास मदत होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपक, देखावे आणि इतर बाबींशी संबंधित शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांनी सामाजिक सलोखा जपावा आणि उत्सव सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या वतीने जिल्ह्यातील गणेश मंडळे व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 18
[ads2]
















Leave a Reply