![]()
अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींचे निकाल उद्या, रविवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ठिकाणचे निकाल घोषित होण्याची शक्यता निवडणूक यंत्रणेने वर्तवली आहे.
.
या सर्व बारा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात ६८.३८ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला, तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे ७० टक्के मतदारांनी मतदान केल्याचा अंदाज आहे.
अंजनगाव सुर्जी वगळता अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार, चिखलदरा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, वरुड, मोर्शी आणि शेंदुरजनाघाट या नऊ नगरपालिका तसेच धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या दोन नगरपंचायतींमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते.
मतमोजणीसाठी विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्शी, धारणी, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे येथील मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होईल. शेंदुरजनाघाटची कम्युनिटी हॉलमध्ये, चांदूर बाजारची न.प. टाऊन हॉलमध्ये आणि अचलपूरची कल्याण मंडपममध्ये केली जाईल. अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वरुड आणि चिखलदऱ्याची मतमोजणी नगरपालिका कार्यालयात होणार असून, नांदगाव खंडेश्वरची मतमोजणी आयटीआयच्या हॉलमध्ये होईल.
जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी ३०९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अंजनगाव सुर्जीसाठी सर्वाधिक ४० मनुष्यबळ आवश्यक आहे, तर वरुड आणि अचलपूरसाठी प्रत्येकी ३६, दर्यापूरसाठी ३५, नांदगाव खंडेश्वरसाठी ३०, चांदूर रेल्वेसाठी २८, मोर्शीसाठी २६, चांदूर बाजारसाठी २४, शेंदुरजनाघाटसाठी २३, धामणगाव रेल्वेसाठी २१, धारणीसाठी १६ आणि चिखलदऱ्यासाठी सर्वात कमी ४ मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.
अंजनगाव सुर्जी येथील नगराध्यक्ष आणि २८ नगरसेवकांसह अचलपूर व धारणीच्या प्रत्येकी दोन तसेच दर्यापूर व वरुड नगरपालिकेच्या प्रत्येकी एका मतदारसंघासाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. न्यायालयीन प्रकरणांमुळे या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. छाननीदरम्यान अर्ज अवैध ठरल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती, ज्यामुळे निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत ३ लाख १२ हजार ४३६ मतदारांपैकी २ लाख १३ हजार ६५६ नागरिकांनी मतदान केले होते.
