वार-पलटवार:काँग्रेस नेते अतुल लोंढे यांचा आमदार परिणय फुके यांच्यावर घणाघात; नगरसेवकांबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा तीव्र निषेध

0
atul-londhe-1_1781071713.jpg




काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भाजप आमदार आणि माजी मंत्री परिणय फुके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फुके यांनी नगरसेवकांबाबत वापरलेल्या एका आक्षेपार्ह शब्दावरून लोंढे यांनी भाजपच्या संस्कृतीवर आणि निवडणुकीतील त्यांच्या रणनीतीवर सडकून टीका केली आहे. नेमका वाद काय? सध्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांसारखे स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मतदार आहेत. त्यामुळे विविध पक्षांकडून आपल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी बैठका, शिबिरे आणि सहलींचे आयोजन केले जात असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी भाजपवर आरोप करत नगरसेवकांना प्रलोभने दाखवली जात असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार परिणय फुके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नगरसेवकांच्या भूमिकेबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. फुके यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून, नगरसेवकांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. काय म्हणाले अतुल लोंढे? अतुल लोंढे म्हणाले की, “मी सत्य बोललो होतो की कशाप्रकारे नगरसेवक आणि मतदारांना प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पण परिणय फुके यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत सर्व नगरसेवकांना ‘वेश्या’ संबोधले आणि भाजपची खरी संस्कृती दाखवून दिली आहे.” काँग्रेस आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रयत्नांमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात आरक्षण मिळाले आहे. अनेक नगरसेविका या महिला असून अशा परिस्थितीत नगरसेवकांना उद्देशून अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे लोंढे यांनी म्हटले. भाजपच्या संस्कृतीवर निशाणा अतुल लोंढे यांनी भाजपवर निशाणा साधताना महिला सन्मानाच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केले. काही चर्चित प्रकरणांचा संदर्भ देत महिलांविषयीचा भाजपचा दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवकांना उद्देशून वापरण्यात आलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीची चूक नसून भाजपच्या राजकीय संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याचे ते म्हणाले. पराभवाच्या भीतीने नगरसेवकांना सहली? काँग्रेस ताकदीने निवडणूक लढत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्यांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, असा दावा लोंढे यांनी केला. याच भीतीमुळे नगरसेवकांना विविध ठिकाणी सहलीवर नेले जात असल्याचे त्यांनी म्हटले. “नगरसेवक स्वतःच्या खर्चाने सहलीला जात आहेत, असा दावा भाजप करत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर सामूहिक आरक्षणे केली जात आहेत. काय सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. जनता आणि मतदार इतकेही भोळे नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप तीव्र भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगू लागले आहे. नगरसेवकांच्या मतांवर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वच पक्षांकडून मतदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत परिणय फुके यांच्या कथित वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आता राजकीय रंग घेताना दिसत आहे. काँग्रेसने या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला असून भाजपकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed