यंत्राच्या पट्ट्यात ओढला गेला तरुण:वाईतील फॉन्ड्रीत 23 वर्षीय कामगाराचा मृत्यू; पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना

[ads1]


वाई औद्योगिक वसाहतीतील अथर्व फॉन्ड्री कंपनीत काम करताना कन्व्हेयर बेल्टमध्ये हात अडकून यंत्राच्या आत ओढला गेल्याने 23 वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सँडप्लॅन्ट विभागात ही दुर्घटना घडली. या घटनेने औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जयप्रकाश शिवपती निषाद (वय 23, रा. अनपट वस्ती, वाई; मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयप्रकाश हा अथर्व फॉन्ड्रीच्या सँडप्लॅन्ट विभागात काम करीत होता. सोमवारी पहाटे सुमारे 3.40 वाजता काम सुरू असताना त्याचा हात अचानक मशीनच्या कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकला. बेल्टने त्याला यंत्राच्या दिशेने ओढल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात होताच सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून मशीनचा बेल्ट ढिला करून जयप्रकाशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती सुरक्षा रक्षक चंद्रकांत सदाशिव खामकर यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या माहितीवरून वाई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर फॉन्ड्री व औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. यंत्रांभोवती संरक्षक आवरण, आपत्कालीन बंद यंत्रणा आणि कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण दिले जाते का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. अपघातामागे सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *