Maharashtra Municipal Elections NCP Stands MVA Alliance Talks Continue Congress Shiv Sena Decision | महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीवर ठाम: एकमत न झाल्यासच पर्यायी वाटचाल: शशिकांत शिंदे – Pune News



आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका ठाम आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्यासच दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट स

.

पुण्यात आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेससोबत एक-दोन फेऱ्यांच्या प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. या चर्चांमध्ये सकारात्मक वातावरण असले तरी अंतिम धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावरच घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष, स्थानिक प्रतिनिधी आणि कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. “स्थानिक पातळीवर वातावरण अनुकूल असले तरी आघाडीचा अंतिम निर्णय हा राज्यस्तरीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याच संदर्भात काल खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन शिवसेनेची भूमिका मांडल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत एकमताने निर्णय घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष आणि कोअर कमिटीला याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, शनिवारच्या संध्याकाळपर्यंत शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडीच्या शक्यता, जागावाटप आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्या अहवालाच्या आधारे पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे ठामपणे सांगताना शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडी हाच आमचा पहिला आणि प्राधान्याचा पर्याय आहे. मात्र, जर आघाडीमध्ये एकमत झाले नाही, तरच दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागेल.” राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते. त्यामुळे आघाडी टिकवण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत दोन मतप्रवाह असल्याचेही त्यांनी मान्य केले. काहींचे मत आहे की प्रभागरचना आणि वार्डनिहाय परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय न घेतल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा लागेल, तर दुसरा प्रवाह महाविकास आघाडीबरोबरच ठामपणे राहण्याचा आहे. आजची जिल्हास्तरीय बैठक ही या विविध मतप्रवाहांची भूमिका समजून घेऊन वरिष्ठ पातळीवर मांडण्यासाठी होती, असेही शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *