पुण्यात नवले ब्रिजजवळ 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीवर हल्ला:जबरदस्ती गाडीत ओढण्याचा प्रयत्न, खासदार सुप्रिया सुळेंनीही घेतली दखल

[ads1]


पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत ‘मामी’ची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यावर पुण्यातील नवले ब्रिज परिसरात काही गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करून पैशांची मागणी केली तसेच त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हातावरील जखमा दाखवून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर ताशेरे ओढत गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. नेमकी काय घडली घटना? अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर या मुंबईहून साताऱ्याकडे जात असताना पुण्यात नवले ब्रिजखाली ही घटना घडली. चार अनोळखी गावगुंडांनी कल्याणी नंदकिशोर यांच्या कारसमोर स्वतःची गाडी आडवी घालून जाणीवपूर्वक धडक दिली. त्यानंतर त्यांनी पैशांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. पैसे उकळता आले नाहीत तेव्हा संतापलेल्या गुंडांनी कल्याणी यांचा हात जबरदस्तीने ओढून स्वतःच्या गाडीत बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अभिनेत्रीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दबावाखाली गुंडांना पळवले? कल्याणी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असाही आरोप केला आहे की, वाहतूक पोलिसांनी दबावाखाली येऊन त्या गुंडांना घटनास्थळावरून पळवून लावले. जर तिथेच पकडून त्यांची मेडिकल तपासणी केली असती, तर त्यांनी कोणती नशा केली होती किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह केले होते हे सिद्ध झाले असते. “महाराष्ट्रात महिला कुठे सुरक्षित आहेत?” – अभिनेत्रीचा संताप व्हिडिओमध्ये संताप व्यक्त करताना कल्याणी नंदकिशोर म्हणाल्या, “मी एक कलाकार आहे म्हणून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर व्यक्त होऊ शकते. पण हा प्रश्न केवळ माझा नसून महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या सुरक्षिततेचा आहे. आज आपल्याकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रूपाने एक महिला सत्तेत आहे, तरीही राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. महिला गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत किंवा कुटुंबासोबत असतानाही सुरक्षित नाहीत. मी रात्री ११ वाजता नऱ्हे पोलीस ठाण्यात गेले, तर सकाळी ६ वाजेपर्यंत केवळ एफआयआर आणि वैद्यकीय चाचणीची (ससून रुग्णालय) किचकट प्रक्रिया सुरू होती. माझ्यासोबत कुटुंब होते म्हणून मी हे करू शकले, सामान्य महिला असती तर तिचे काय झाले असते? दोन दिवस उलटूनही ते गुंड फोन बंद करून मोकाट फिरत आहेत आणि सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात येऊन ‘तक्रार करू नका’ म्हणून सेटलमेंट करायला पाहत आहेत!” त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाला या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला, “पुण्यातील नवले ब्रीज परिसरात काही गुंडांनी कल्याणी नंदकिशोर या लोकप्रिय अभिनेत्रीची गाडी अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. पुण्यात गृहखात्याच्या नाकावर टिच्चून गुंड अशा पद्धतीने नागरिकांना त्रास देण्याचे उद्योग करीत आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. माझी राज्याच्या गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सदर अभिनेत्रीला त्रास देणाऱ्या गुंडांचा योग्य तो बंदोबस्त करावा.” नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अभिनेत्रीने नऱ्हे पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी वर्षा देशमुख आणि थिटे साहेब यांनी सहकार्य केल्याचे नमूद केले असून, या गावगुंडांविरोधात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर दोन दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हेही वाचा… जवळजवळ सर्व मागण्या पूर्ण, गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन अयोग्य: देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना आंदोलनाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन “मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने बहुतांश सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या काही उर्वरित मागण्या आहेत, त्या सध्या न्यायालयाच्या विविध टप्प्यांवर असून संविधानाच्या चौकटीतच त्यावर निर्णय होऊ शकतो. अशा वेळी गणेशोत्सवाचे पर्व सुरू असताना मुंबईत आंदोलन करणे आणि गणेशभक्तांना असुविधा निर्माण करणे कोणासाठीही योग्य नाही. त्यामुळे या आंदोलनाचा निश्चितपणे पुनर्विचार व्हावा,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *