2019 मध्ये मुलाचा मृत्यू, सुनेवर जादूटोण्याचा संशय:70 वर्षीय सासऱ्याने कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर विहिरीत उडी

[ads1]


मुलाच्या मृत्यूला सूनच जबाबदार असल्याचा संशय आणि त्यातून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने अखेर टोक गाठले. सुनेने जादूटोणा केल्याच्या संशयातून 70 वर्षीय सासऱ्याने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. हल्ल्यानंतर आरोपी सासऱ्याने पोलिसांच्या भीतीने घरामागील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहुणे ले-आऊट, पिवळी नदी परिसरात शनिवारी घडली. या घटनेत लक्ष्मी रविशंकर पाली (42) यांचा मृत्यू झाला. तर नाथूलाल भगवान पाली (70) हे जखमी झाले आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेवर संशय पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, नाथूलाल पाली यांच्या मुलाचे म्हणजेच रविशंकर यांचे 2019 मध्ये निधन झाले होते. मुलाच्या मृत्यूनंतर नाथूलाल आणि त्यांची सून लक्ष्मी यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद होत होते. कालांतराने नाथूलाल यांच्या मनात लक्ष्मी यांनी जादूटोणा केल्याचा संशय निर्माण झाला. मुलाचा मृत्यू सुनेने केलेल्या जादूटोण्यामुळे झाला, तसेच जादूटोण्यामुळेच कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडत असल्याचा त्यांना संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.शनिवारी पुन्हा याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यावेळी लक्ष्मी यांची मुलगी नोकरीसाठी बाहेर गेली होती, तर मुलगाही काही कामानिमित्त घराबाहेर होता. त्यामुळे घरात लक्ष्मी आणि नाथूलाल हे दोघेच होते.लक्ष्मी घराच्या मागील बाजूस कपडे धूत असताना नाथूलाल यांनी अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. डोक्यावर गंभीर वार झाल्याने लक्ष्मी यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर विहिरीत उडी सुनेची हत्या केल्यानंतर नाथूलाल यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेतली. पोलिसांकडून अटक होईल आणि शिक्षेला सामोरे जावे लागेल, या भीतीतून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने नाथूलाल यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड ताब्यात घेण्यात आली आहे. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावेही पोलिसांनी जमा केले.फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली असून, आवश्यक नमुने घेतले आहेत. लक्ष्मी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या संशयातून घटना? या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत. नाथूलाल यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. सुनेने जादूटोणा केल्याचा संशय हा हत्येमागील प्रमुख कारण होते का, तसेच या संशयामागे आणखी काही कौटुंबिक वाद किंवा कारण होते का, याचा तपास केला जात आहे.मुलाच्या मृत्यूला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर जादूटोण्याच्या संशयातून झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या संशयातून एका महिलेचा जीव गेल्याने या घटनेची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा.. माझा भाऊ जे करेल ते शांततापूर्वकच करेल!:जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या- आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील! मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचे ते शांततापूर्वकच करेल, असा मला विश्वास आहे,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *