![]()
अमरावती जिल्ह्यातील शाळा मंगळवार, ३० जूनपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शिक्षण विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विदर्भातील तापमानवाढीमुळे अमरावती जिल्ह्यातील शाळा उशिरा सुरू होत आहेत. या तयारीचा आढावा घेण्यासाठी सीईओ गांधी यांनी शिक्षण विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि निवडक शाळांच्या मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या २१ दिवसांत सेतू अभ्यासक्रम राबवण्यावर भर देण्यास सांगितले. पहिल्या दोन तासांत अक्षर ओळख, वाचन, संख्याज्ञान आणि मूलभूत गणित कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पायाभूत चाचणीसाठी स्तरनिहाय नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ‘निपुण भारत मिशन’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ही बैठक पार पडली. यात ‘निपुण मिशन’ सोबतच प्रवेशोत्सव, नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षेचे नियोजन आणि शालेय व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सीईओ गांधी यांनी शाळा परिसर, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे आणि पोषण आहाराचे स्वयंपाकगृह स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यावर भर दिला. धोकादायक ठिकाणे, तुटलेल्या विद्युत तारा आणि इतर त्रुटी तातडीने दुरुस्त करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हास्तर व तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ‘वॉर रूम’द्वारे शाळांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाईल. प्रत्येक गुरुवार ‘गुणवत्ता तपासणी दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले. सर्व सूचना मुख्याध्यापकांनी शिक्षकांपर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही देण्यात आले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षेचे विशेष नियोजन, निवासी मार्गदर्शन वर्ग आणि नियमित सराव चाचण्या आयोजित केल्या जातील. गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. ‘स्पेल बी’सह विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहनपर बक्षिसे, प्रमाणपत्रे आणि विशेष पुरस्कार दिले जातील. शालेय स्तरावर गठित समित्यांच्या नियमित बैठका घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. विद्यार्थ्यांची सुरक्षा, तक्रार पेटी, शासकीय योजनांचे फलक आणि चाइल्ड हेल्पलाइनची माहिती शाळेच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले. नवभारत साक्षरता अभियान, राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना, पीजीआय निर्देशांकाची माहिती आणि देश-राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर विद्यार्थ्यांशी नियमित चर्चासत्रे आयोजित करण्याचे आदेशही सीईओ गांधी यांनी दिले.
अमरावतीतील शाळा 30 जूनपासून सुरू:सीईओ गांधींच्या महत्त्वाच्या सूचना; गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश
