पालखी मार्ग अनधिकृत होर्डिंग्जमुक्त:पीएमआरडीएची धडक कारवाई; 70 होर्डिंग्जवर हातोडा




पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यात आली आहेत. यामुळे पालखी मार्ग आता अनधिकृत होर्डिंग्जपासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा आणि वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या उद्देशाने पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मे महिन्यातच या मार्गांवरील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, अनधिकृत बांधकाम विभागाने पीएमआरडीएच्या हद्दीतील हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील पालखी मार्गांवरील सुमारे १२३ होर्डिंग्जचे सविस्तर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करता बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली तब्बल ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आल्याची माहिती अनधिकृत बांधकाम विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिली. या कारवाईमध्ये हवेली-सोलापूर रस्त्यावरील ३२, दौंड तालुक्यातील १३, पुरंदर तालुक्यातील १३ आणि वडकी येथील १२ अशा एकूण ७० अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाने हातोडा चालवून ती भुईसपाट केली आहेत. काही अनधिकृत होर्डिंगधारकांनी आपली होर्डिंग्ज स्वतःहून काढून घेतली. केवळ मुख्य पालखी मार्गच नव्हे, तर पीएमआरडीएच्या हद्दीतील पुणे जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवरील आणि मोक्याच्या ठिकाणांवरील होर्डिंग्जचेही सर्वेक्षण सध्या वेगाने सुरू आहे. या सर्वेक्षणात अनधिकृत अथवा विनापरवाना उभारलेली होर्डिंग्ज आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित व्यावसायिक आणि जाहिरातदारांनी पीएमआरडीएची रीतसर परवानगी घेऊनच होर्डिंग्ज उभारावीत; अन्यथा प्रशासनाकडून थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही पीएमआरडीए प्रशासनाने दिला आहे. डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए यांनी सांगितले की, “पीएमआरडीएच्या हद्दीत कुठेही होर्डिंग्ज उभारताना प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमबाह्य आणि विनापरवाना उभारलेल्या होर्डिंग्जवर कोणतीही गय न करता थेट निष्कासनाची कारवाई केली जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *