सातारा गुन्हेगारी वृत्त:बंद घर फोडून दागिन्यांवर डल्ला, लाखोंची चोरी; घरात घुसून महिलेचा छळ
![]()
सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान ऐवज लंपास केला. पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजात फॅक्टरीजवळील एका निवासस्थानी ३१ मे ते ४ जून या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, गंठण, चैन, पेंडंट, डायमंड अंगठी, टॉप्स तसेच इतर मौल्यवान दागिन्यांसह एकूण ७ लाख २ हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मनीषा विशाल पुजारी यांनी तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलीस उपनिरीक्षक गोवेकर पुढील तपास करत आहेत. घरात घुसून महिलेचा छळ; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल सातारा तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात घुसून गैरवर्तन केल्याप्रकरणी एका युवकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी रात्री संबंधित महिला घरात असताना आरोपीने प्रथम खिडकीतून घरात डोकावले. त्यानंतर तो थेट बेडरूममध्ये शिरून महिलेचा विनयभंग केला. महिला ओरडू लागल्यानंतर आरोपीने तिला धमकावत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी ५५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रोशन सुरेश घोरपडे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत व्यवसाय; पान सेंटर चालकांवर कारवाई शहरातील सेव्हन स्टार परिसरात निर्धारित वेळेनंतर पान सेंटर सुरू ठेवणाऱ्या दोघांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ४ जून रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ओम साई पान सेंटरवर तपासणी केली असता दुकान सुरू असल्याचे आढळून आले. संबंधितांकडे उशिरापर्यंत व्यवसाय चालविण्याची अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अमोल महादेव चव्हाण (वय २५) आणि एका १८ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मोहरे करीत आहेत. सामान आणण्यासाठी बाहेर पडलेली महिला अद्याप बेपत्ता घरातून किराणा सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडलेल्या महिलेचा शोध अद्याप लागलेला नसल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रजनी पंकज जाधव (वय ३०) या घरातून बाहेर पडल्यानंतर परत आल्या नाहीत. नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. याबाबत पती पंकज शंकर जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून विविध माध्यमांतून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून महिला पोलीस हवालदार पाटील या तपासाची जबाबदारी सांभाळत आहेत.
