गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री धडक कारवाई; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. ४ जून) पहाटे १.३० वाजता धडक कारवाई करत मोठा फटका दिला. या कारवाईत दोन बोटी, २० तराफे नष्ट करण्यात आले असून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत ३० लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक पाहणी केली असता गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ तहसीलदार संजय वारकड यांना सूचना दिल्या. महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होताच कारवाईला सुरुवात करण्यात आली.
कारवाईदरम्यान नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकानेही सहभाग घेतला. तसेच नदीच्या दुसऱ्या बाजूवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लिंबगाव पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. संयुक्त पथकाने अवैध वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन बोटी आणि २० तराफे नष्ट करून मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली.
कारवाईनंतर परतत असताना शहर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहनेही पकडण्यात आली. ही वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या चार मजुरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या विशेष मोहिमेत तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.”
प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यातील अवैध उत्खननावर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

