मूर्ती तपासण्यासाठी ‘लायडार स्कॅन’चा आहे प्रस्ताव:आषाढी वारीपूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे जतन व संवर्धन; पुरातत्त्वच्या मार्गदर्शनानुसार तीन दिवसांत अंतिम निर्णय
![]()
कोट्यवधी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती चिरकाल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने गुरुवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ तज्ज्ञांमार्फत विठ्ठल मूर्तीचे निरीक्षण करण्यात आले. या संदर्भातील आवश्यक सल्लामसलत करून पुढील दोन ते तीन दिवसांत संवर्धनाचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. मूर्ती संवर्धनासंदर्भात आयोजित बैठकीनंतर जिल्हाधिकारी पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीस मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य, स्थानिक महाराज मंडळी, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मूर्ती संवर्धन तज्ज्ञ उपस्थित होते. मूर्ती जतन करण्यास कुणाचाही विरोध नाही -औसेकर मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, “श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून ती कोट्यवधी वारकरी भाविकांचा श्वास आहे. मूर्तीचे जतन व संवर्धन करण्यास मंदिर समितीचा किंवा कुणाचाही विरोध नाही.’ देशातील एकमेव मंदिर, जिथे थेट देवाचे पददर्शन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन म्हणाले की, “भारतभरात पंढरपूर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे भाविकांना थेट देवाचे पददर्शन घेता येते. त्यामुळे मूर्ती दीर्घकाळ सुरक्षित राहावी, यासाठी तिचे जतन व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची संमती आवश्यक प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे व अवशेष कायदा १९५८ नुसार मूर्ती अथवा स्मारक केंद्रीय संरक्षित स्मारक असेल तर केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असते. मूर्तीच्या “लायडार स्कॅन’ करिता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय परवानगी देऊ शकते. हे स्कॅनिंग लेझर तंत्रज्ञानाद्वारे मूर्तीची अंतर्गत रचना डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड होते. स्कॅनिंगचा प्राचीन मूर्तीवर काही परिणाम होणार नाही.
