सापडलेले सोन्याचे दागिने मूळ मालकाला परत:डॉ. कपिल अहिरे, यश बच्छाव यांचा प्रामाणिकपणा
![]()
माणुसकी अजून जिवंत आहे, याचा प्रत्यय देणारी घटना जायखेडा परिसरात घडली. रस्त्यात सापडलेले सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेले पाकीट कुठलाही मोह न बाळगता मूळ मालकाला परत करून पशुसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ. कपिल अहिरे आणि त्यांचे सहकारी यश बच्छाव यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखवाडीजवळ रस्त्यालगत डॉ. कपिल अहिरे आणि यश बच्छाव यांना एक पाकीट सापडले. पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे आढळून आले. मात्र, त्यांनी प्रामाणिकपणाला प्राधान्य देत तात्काळ सामाजिक कार्यकर्ते महेश शेवाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर परिसरात पाकीट हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. योग्य खातरजमा केल्यानंतर हे पाकीट बबन बोरसे (रा. ब्राह्मणपाडे) यांच्या कुटुंबातील महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जायखेडा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या उपस्थितीत बबन बोरसे यांच्याकडे मौल्यवान ऐवज सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आला.
