नाशिक विधान परिषदेत महायुतीतील बंड शमले:अखेर गोकुळ गीते यांची माघार; नरेंद्र दराडेंचा मार्ग सुकर; महायुतीच्या नेत्यांची शिष्टाई फळाला

0
new-project-2026-06-11t150902788_1781170750.jpg




नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात नेत्यांना मोठे यश आले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू असलेले मनधरणीचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. गोकुळ गीते यांनी केवळ माघारच घेतली नाही, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (शिवसेना) यांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले आहे. गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या गोटातून वेगवान हालचाली सुरू होत्या. आज राज्याचे मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये गोकुळ गीते यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या नेत्यांसोबत झालेल्या प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चेनंतर गीते यांनी माघार घेण्यास संमती दर्शवली. पत्रकार परिषदेत केली अधिकृत घोषणा नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गीते यांनी, आपण निवडणुकीतून माघार घेत असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. गोकुळ गीते यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महायुतीच्या गोटात मोठा दिलासा मिळाला आहे. मतविभाजनाचा धोका टळल्यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर मानला जात आहे. असा निर्माण झाला होता महायुतीत पेच नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या सुरुवातीला राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपचे नेते गणेश गीते यांनी पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष म्हणून दंड थोपटत अर्ज भरला होता. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाच्या गणितात ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षादेश मानून गणेश गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला; मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी अर्ज कायम ठेवल्यामुळे महायुतीसमोर मतांच्या विभाजनाचे आणि बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले होते. या बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या गोटात चिंतेचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *