भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधानांचा चेहरा द्या!:भास्कर जाधवांचे मोठे वक्तव्य, एक चेहरा दिसतोय, पण नाव सांगणार नाही!
![]()
देशातील राजकारणात भाजपला प्रभावी आव्हान द्यायचे असेल, तर विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिला पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, असे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. “महिला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झाला, तर देशाच्या राजकारणात मोठा चमत्कार घडू शकतो,” असे सांगत त्यांनी नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडले. चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जाधव यांनी केंद्रातील मोदी सरकार, भाजप, महायुती आणि राज्यातील सत्तासमीकरणांवर जोरदार टीका केली. “मला एक महिला चेहरा दिसतोय, पण नाव सांगणार नाही” विरोधकांनी एकत्र येऊन पंतप्रधानपदासाठी महिला नेतृत्व पुढे आणावे, अशी भूमिका मांडताना जाधव म्हणाले की, देशातील महिला मतदारांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत एखाद्या सक्षम महिला नेत्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले, तर त्याचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो. “मला स्वतःला एक महिला चेहरा दिसत आहे. मात्र, त्या नावाबद्दल आताच बोलणे योग्य ठरणार नाही,” असे सांगत त्यांनी उत्सुकता वाढवली. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. “एकनाथ शिंदेंच्या जागांवर भाजपनेच बंडखोर उभे केले” महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना भास्कर जाधव यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर भाष्य केले. ते म्हणाले, “बंडखोर उभे करणे ही भाजपची जुनी कार्यपद्धती आहे. ज्या-ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उमेदवारी देण्यात आली, तिथे भाजपनेच आपले बंडखोर उमेदवार उभे केले.” “शिंदे गटाला १७ पैकी १० जागांची अपेक्षा होती, पण त्यांच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या. आता त्यांचे उमेदवार निवडून आले तर त्याचे श्रेयही भाजप स्वतःकडे घेईल,” असा टोला त्यांनी लगावला. मोदींच्या विक्रमावरून राजेश खन्नांचा डायलॉग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम केल्याचा भाजपकडून प्रचार केला जात आहे. यावर भाष्य करताना भास्कर जाधव यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रसिद्ध संवादाचा आधार घेत मोदी सरकारवर टीका केली. “बाबू मोशाय… जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं.” जाधव म्हणाले, “पंतप्रधानपदावर किती दिवस बसलो हे महत्त्वाचे नाही. त्या काळात देशातील नागरिकांना काय दिले, त्यांचे जीवन किती सुधारले, याचे मूल्यमापन झाले पाहिजे.” “‘सलग’ हा शब्द भाजपच्या सोयीचा” मोदींच्या कार्यकाळाच्या विक्रमाबाबत बोलताना त्यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. “जवाहरलाल नेहरूंचा कार्यकाळ १९४७ पासून मोजला जातो. इंदिरा गांधी देखील मोदींपेक्षा अधिक काळ पंतप्रधान राहिल्या आहेत. मात्र, त्या सलग नसल्यामुळे भाजप त्यांची गणना करत नाही. ‘सलग’ हा शब्द भाजपच्या राजकीय सोयीसाठी वापरला जातो,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “मोदी सरकारच्या कामगिरीबाबत मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. मात्र, त्यामागील वास्तविक आकडेवारी आणि परिणाम जनतेसमोर मांडले जात नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली. “लोकशाहीसमोर गंभीर संकट” देशातील निवडणूक प्रक्रियेवर चिंता व्यक्त करताना जाधव म्हणाले की, मतदानाचा हक्क हळूहळू कमकुवत केला जात आहे. “अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध होत आहेत. त्यामुळे मतदानाचे महत्त्व कमी होत चालले आहे. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” असे ते म्हणाले. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, खतांची टंचाई, बेरोजगारी आणि महागाई यासारख्या प्रश्नांवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गिरीश महाजनांवरही हल्लाबोल पंजाब दौऱ्यातील वक्तव्यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली. “महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांबाबत भाजपला कधीही दुःख वाटले नाही. पंजाबमध्ये जाऊन इंदिरा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्यांना राष्ट्रप्रेमी म्हणता येणार नाही,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “गिरीश महाजन यांच्यासारखे नेते केवळ कोणाची तरी हुजरेगिरी करतात म्हणून मंत्री झाले आहेत,” अशी जहरी टीकाही त्यांनी केली.
