Ranveer Singh | ‘डॉन 3’ वादात नवी अपडेट; इंडस्ट्रीतील बंदीविरोधात रणवीर सिंगने उचललं मोठं पाऊल

0
ranveer-singh-.png


Ranveer Singh | डॉन ३’ (Don 3) या चित्रपटावरून बॉलिवूडमध्ये सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला असून, तो थेट कोर्टाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. चित्रपट निर्माते टीपी अग्रवाल यांच्यानंतर आता खुद्द अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने आक्रमक पाऊल उचलत थेट ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ (FWICE) विरोधात कायदेशीर खटला दाखल केला आहे.

‘एनडीटीव्ही’ने (NDTV) दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंहच्या लीगल टीमने २ जून २०२६ रोजी फेडरेशनला एक अधिकृत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फेडरेशनने रणवीरविरोधात जारी केलेल्या ‘नॉन को-ऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (असहकाराचा आदेश) या निर्णयाला आव्हान देण्यासाठी रणवीरने हे पाऊल उचलले आहे.

आज फेडरेशनची महत्त्वाची पत्रकार परिषद

रणवीर सिंहकडून मिळालेल्या या कायदेशीर नोटिशीमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी FWICE ने आज, ३ जून २०२६ रोजी एक तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत फेडरेशन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.

टीपी अग्रवाल यांचाही रणवीरला पाठिंबा

या वादात रणवीर सिंह एकटा नसून, त्याला उद्योगातील ज्येष्ठ निर्माते आणि IMPPA चे माजी अध्यक्ष टीपी अग्रवाल यांचे मोठे समर्थन लाभले आहे. टीपी अग्रवाल यांनी यापूर्वीच फेडरेशनच्या या हुकूमशाही निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. “फेडरेशनने रणवीर सिंहच्या विरोधात जारी केलेले निर्देश पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर असून, फेडरेशनवरच कडक कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी अग्रवाल यांनी आपल्या याचिकेत केली होती.

नेमकं काय आहे ‘डॉन ३’ प्रकरण?

या संपूर्ण वादाची सुरुवात दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ या चित्रपटापासून झाली.
१) चित्रपटातून अचानक माघार: रणवीर सिंहने २०२३ मध्ये ‘डॉन ३’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारली होती आणि त्याची अधिकृत घोषणाही झाली होती. मात्र, त्याच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशानंतर रणवीर आणि फरहान अख्तर यांच्यात काही कारणांमुळे मतभेद झाले. परिणामी, चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याला काही दिवस शिल्लक असताना रणवीरने अचानक या बिग बजेट प्रोजेक्टमधून माघार घेतली.
२) निर्मात्यांचे नुकसान आणि तक्रार: रणवीरने अचानक नकार दिल्यामुळे फरहान अख्तर आणि निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आपापसातील चर्चेतून हा प्रश्न सुटू न शकल्याने अखेर फरहानने ‘FWICE’ कडे अधिकृत तक्रार दाखल केली.
३) असहकाराचा आदेश (Non Co-operation): या तक्रारीची दखल घेत फेडरेशनने रणवीर सिंहला त्याची बाजू मांडण्यासाठी दर १० दिवसांच्या अंतराने एकूण तीन वेळा नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, रणवीरकडून या नोटिसांना कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने, अखेर फेडरेशनने कडक पाऊल उचलत आपल्या सर्व सदस्यांना रणवीर सिंहसोबत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम न करण्याचे आदेश दिले.

रणवीरने पाठवलेल्या नोटिशीमध्ये त्याने नेमक्या काय मागण्या केल्या आहेत, हे अद्याप पूर्णपणे समोर आलेले नाही. मात्र, या कायदेशीर लढाईमुळे ‘डॉन ३’ च्या भवितव्यावर आणि रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सवर याचा काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

News Title: Ranveer Singh FWICE Legal Notice Don 3 Controversy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *