भाजपवाले जसं पक्ष फोडतात, तसं इंग्लिश मीडियमची मुलं फोडा:गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

[ads1]


मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी शाळांकडे वळवा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तुलना भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाशी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात हशा पिकला असून, त्यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील 15 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक, मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबत भाष्य केले. इंग्लिश मीडियमची मुलं फोडा गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या टिकवणे हे मोठे आव्हान बनले आहे. अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. यावर बोलताना त्यांनी शिक्षकांना मिश्कीलपणे भाजपच्या राजकारणाचा दाखला दिला. “ज्याप्रमाणे भाजपवाले कोणालाही आपल्या पक्षात घेतात, त्याप्रमाणे तुम्हीही इंग्लिश मीडियमची मुलं फोडली पाहिजेत आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत आणलं पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. इंग्रजी लोणच्यासारखी असावी मराठी शाळांबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्वही मान्य केले. जेवणात लोणचं जितकं आवश्यक असतं, तितकीच इंग्रजी आपल्याला आली पाहिजे; मात्र त्याचवेळी आपल्या मातृभाषेचा आणि मराठी भाषेचा आदर कायम ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले. आजच्या काळात पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल दिसून येत आहे. त्यामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शाळांची पटसंख्या वाढवा आदर्श शिक्षक घडवायचे असतील तर मराठी शाळांची पटसंख्या वाढवणे गरजेचे आहे, असेही पाटील म्हणाले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात यंदा १५ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पूर्वी जिल्ह्यातील 75 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जात होता. आता ही संख्या 15 वर आली आहे. मात्र पुरस्कार मिळाला नाही म्हणून एखादा शिक्षक आदर्श नसतो असे नाही. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मुलं हीच खरी संपत्ती राजकारण्यांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असली तरी आपल्या मुलांनी आयुष्यात काय साध्य केले, हीच खरी संपत्ती असल्याचे पाटील यांनी सांगितले. “राजकारण्यांकडे कितीही प्रॉपर्टी असली तरी आपली मुलं कशी घडली, हेच आपलं मोठं यश आहे,” असे ते म्हणाले. आदर्श शिक्षक होण्यात त्यांच्या कुटुंबाची, विशेषतः पत्नीची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिक्षक भरतीसाठी पटसंख्या महत्त्वाची मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचा परिणाम शिक्षक भरतीवरही होत असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. “मराठी शाळांची पटसंख्या टिकली तरच शिक्षकांची भरती होईल. पटसंख्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षक भरती रखडली आहे,” असे त्यांनी म्हटले. सरकारी शाळांची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली असून, शाळांसाठी सरकारकडून निधी दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या ड्रेसकोडचाही मुद्दा उपस्थित यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांच्या ड्रेसकोडचा मुद्दाही उपस्थित केला. पूर्वी शिक्षक ठराविक ड्रेसकोडमध्ये शाळेत येत असत. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. शिक्षक हे गुरुच्या स्थानी असल्याने शाळेत शिक्षकांचा ड्रेसकोड असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी शाळांकडे वळवताना भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाचा दिलेला संदर्भ हा त्यांच्या भाषणातील चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी हशा केला असला तरी, मराठी शाळांमधील घटती पटसंख्या आणि इंग्रजी माध्यमाकडे वाढणारा पालकांचा कल यावर त्यांनी उपस्थित केलेले मुद्देही महत्त्वाचे ठरले आहेत हेही वाचा.. अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाला अखेर दिलासा:नागेश भोईरच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मंत्री प्रताप सरनाईक उचलणार, कुटुंबालाही आर्थिक मदत मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी उत्सव मानवी मनोऱ्यांच्या उंचीमुळे नेहमीच चर्चेत असतो, मात्र याच उत्सवात गोविंदा जखमी होण्याच्या घटना सातत्याने समोर येतात. 2009 सालच्या अशाच एका दुर्घटनेत थरावरून कोसळल्यामुळे नागेश भोईर हा गोविंदा गंभीर जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून आहे. यंदाच्या उत्सवातही काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक दिलासादायक निर्णय घेत गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणात खितपत पडलेल्या नागेश भोईरच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *