चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा खून:वाघोलीतून कर्नाटकचा प्रियकर फरार, मुलगी पश्चिम बंगालमधील असल्याचे आले समोर
![]()
चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. २६ वर्षीय रिहाना खातून असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर इम्रान राजेसाब बोदले खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान आणि रिहाना हे विवाह न करता वाघोलीतील शिवलक्ष्मी बिल्डिंगमध्ये एकत्र राहत होते. ते पती-पत्नी असल्याचे भासवत होते. गेल्या काही महिन्यांपासून इम्रान रिहानाच्या चारित्र्यावर संशय घेत होता, यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. २८ मे रोजी त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वादावादी झाली. या वादातून आरोपी इम्रानने रिहानाला मारहाण करून तिचा खून केला. खून केल्यानंतर त्याने घराला कुलूप लावले आणि तो पसार झाला. आरोपी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घराचे कुलूप तोडले असता, रिहाना मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त नूतन पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. फरार झालेल्या आरोपी इम्रान राजेसाब बोदले खान याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय चंदन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रिहाना खातून मूळची पश्चिम बंगालमधील दईगाजन, भागनपूर, जि. मेदनपूर येथील होती, तर आरोपी इम्रान मूळचा कर्नाटकातील गदग येथील रहिवासी आहे.
