सातारा झेडपीत तडीपार गुंडाच्या उपस्थिती बर्थडे पार्टी:सभापतींनी स्वतःच्या केबिनमध्ये कापला केक, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

0
new-project-2026-06-02t221041826_1780418674.jpg




सातारा जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे पार्टी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी आपल्या केबिनमध्ये तडीपार गुंडाच्या उपस्थितीत मित्राच्या वाढदिवसाचा केक कापल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तडीपार गुंड खुलेआम फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राड्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आता तर तडीपार गुंडाच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या लौकिकाला पुन्हा डाग लागला आहे. समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी केबिनमध्ये शंभू साळुंखे या मित्राच्या वाढदिवसाचा केक तडीपार गुंड बिऱ्या ऊर्फ अमित कदम याच्या उपस्थितीत कापला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सातारा जिल्हा परिषदेला मोठा राजकीय वारसा आहे. अनेक दिग्गजांनी झेडपीचे नेतृत्व केले आहे. आज अखेर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेवर जिल्हा परिषदेचं राजकारण सुरू होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत यशवंत विचाराला गालबोट लागले. सत्तेसाठी आमदार, मंत्र्यांची झोंबाझोंबी, पोलिसांकडून मंत्र्यांना धक्काबुक्की झाली. त्या राड्यामुळे सातारा जिल्हा परिषदेची राज्यभर शोभा झाली असताना त्याच जिल्हा परिषदेत एका तडीपार गुंडाच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने सर्व भेदांचा अवलंब करून झेडपीची सत्ता मिळवली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदेत तडीपार गुंडांना थेट पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश मिळतो. परंतु, सामान्य लोकांना पदाधिकारी भेटतात का? हा संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, तडीपार गुंडाच्या उपस्थितीत झालेल्या बर्थडे पार्टीनंतर आता खुलेआम फिरणाऱ्या तडीपार गुंडांच्या पोलीस मुसक्या आवळणार का, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेत झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी जिल्हा परिषदेतील माझ्या केबिनमध्ये असताना माझे मित्र शंभू साळुंखे हे माझ्या कार्यालयात आले. आम्ही शंभू याच्या वाढदिवसाचा केक कापला. त्यांच्यासोबत कोण आहे, याची मला कोणतीही कल्पना नव्हती. हे सर्व अनावधानाने झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *