विषारी दारू प्रकरणातील मृतांचा खरा आकडा समोर आणा:डॉ. नीलम गोऱ्हे यांची CIDकडे मागणी, व्यापक तपासाची गरज असल्याचे मत
![]()
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात मृत्यूंचा आणि बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. डॉ. गोऱ्हे यांनी सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक शफकत आमना, पोलिस उपअधीक्षक सचिन चव्हाण आणि शामराव काळे यांच्याशी सुमारे ३५ मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी तपासातील त्रुटी, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि पुढील तपासाची दिशा यावर अनेक सूचना मांडल्या. पत्रकारांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विषारी दारूमुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला, त्यांच्याबरोबरच त्या काळात तत्सम लक्षणे असलेल्या रुग्णांचाही शोध घेणे आवश्यक आहे. यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे. तसेच, संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नोंदींचीही तपासणी करावी. काही व्यक्ती आजारी पडल्यानंतर किंवा मृत्यूनंतर त्यांच्या मूळ गावी परतल्या असण्याची शक्यता आहे. कर्नाटक, लातूर, बिहारसह इतर राज्यांत गेलेल्या व्यक्तींची माहितीही गोळा केली पाहिजे. प्रसारमाध्यमे आणि स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून आवाहन करून नागरिकांनी अशा व्यक्तींबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. काहींना मुद्दामहून गायब करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचाही तपास व्हायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. तपासादरम्यान नागरिकांना निर्भयपणे माहिती देता यावी यासाठी पिंपरी-चिंचवड आणि हडपसर येथे सीआयडीचे तात्पुरते संपर्क कार्यालय सुरू करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. तसेच, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्सॲप क्रमांक सार्वजनिक करावेत, जेणेकरून नागरिक थेट तक्रारी आणि पुरावे सादर करू शकतील, अशी मागणी त्यांनी केली. पूर्वी नागरिकांनी काही निवेदने दिली असतील आणि त्यावर कारवाई झाली नसेल, तर ती माहितीही सीआयडीपर्यंत पोहोचली पाहिजे. यामुळे प्रशासनातील हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष कोठे झाले हे स्पष्ट होण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या. हडपसर, फुगेवाडी आणि इतर काही भागांमध्ये नागरिकांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागासह सर्व यंत्रणांची नैतिक जबाबदारी उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या कामकाजाबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाकडे यापूर्वीपासून अवैध हातभट्टी आणि विषारी दारूच्या व्यवसायाची माहिती होती, तसेच संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अशा प्रकारची मोठी दुर्घटना घडल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी सूचित केले. केवळ कारवाई दाखविणे पुरेसे नसते, तर त्या कारवाईचे परिणाम प्रत्यक्षात दिसणेही आवश्यक असते. पूर्वी माहिती असूनही जर अवैध दारूचे जाळे सुरू राहिले असेल, तर त्यामागे नेमकी कुठे त्रुटी राहिली याची चौकशी झाली पाहिजे,असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. सर्वच विभागांच्या भूमिकेची तपासणी होणे आवश्यक या प्रकरणात उत्पादन शुल्क विभाग, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन अशा सर्वच संबंधित यंत्रणांच्या भूमिकेची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवर जबाबदारी निश्चित करून कोणाकडून हलगर्जीपणा झाला, कोणत्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध माहितीवर वेळेत कारवाई केली नाही आणि कोणत्या कारणांमुळे अवैध व्यवसाय वाढत गेला, याचा सखोल शोध घेणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. अधिवेशनातही मुद्दा उपस्थित करणार २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा विषय जोरदारपणे मांडला जाईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. अनेक आमदार या प्रकरणाची पाहणी करत आहेत. पिंपरी-चिंचवड भागात प्रशासनाची हालचाल दिसते; मात्र हडपसर भागात काही प्रमाणात शिथिलता जाणवते, अशी टीकाही त्यांनी केली.महापालिकेने बाधित कुटुंबांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली असली तरी अनेक कुटुंबांपर्यंत ती अद्याप पोहोचलेली नसल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. समाजातील काहीजण मदतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत; मात्र मृत व्यक्तींची कुटुंबे ही दारूच्या व्यसनाची नव्हे, तर त्या दुर्घटनेची बळी ठरलेली आहेत. त्यांना आधार दिला तरच ते पुढे येऊन साक्ष देतील आणि दोषींना शिक्षा होण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.सरकारने मृत्यूंची वास्तव संख्या स्वीकारून सर्व प्रभावित कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवावी, अशी मागणी करत नागरिकांनीही कोणतीही माहिती लपवू नये आणि तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
