मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई:74 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त; दोन अटकेत
![]()
देशभरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरुद्ध पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत थेट गुजरातमध्ये धडक कारवाई केली आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला येथे सुरू असलेला ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करून पोलिसांनी ७४ कोटी ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०२६ रोजी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर १०९ ग्रॅम मेफेड्रॉनसह मुस्कान समीर खान (२६) हिला अटक करण्यात आली होती. तिच्याकडे झालेल्या कसून चौकशीतून गुजरातमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे साकीनाका पोलिसांच्या पथकाने नर्मदा जिल्ह्यातील नांदोद तालुक्यातील वरखड गावात छापा टाकला. पप्पूनं भाड्यानं घेतली होती जागा; ७४ कोटींचं लिक्विड जप्त या रॅकेटचा दुसरा सूत्रधार वजूळ कमर अबुल वफा चौधरी उर्फ पप्पू (५६) याला शिळफाटा येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानेच गुजरातमध्ये घर भाड्याने घेऊन तिथे ड्रग्ज निर्मितीची प्रयोगशाळा सुरू केली होती. छाप्यात पोलिसांनी २० किलोहून अधिक लिक्विड मेफेड्रॉन जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ७४.४६ कोटी रुपये आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात घातक रसायने, कमर्शिअल फ्रीज, मशिनरी आणि इतर तांत्रिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. साताऱ्यातही पोलिसांचा दणका दुसरीकडे, सातारा जिल्हा पोलिसांनीही अमली पदार्थ विरोधी मोहिमेत यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ४ किलो ६९ ग्रॅम गांजा हस्तगत केला. या कारवाईत गांजासह एक दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, एकूण २ लाख १ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तस्करीची साखळी तोडणार अमली पदार्थांमुळे तरुण पिढी बरबाद होत असून ही तस्करी रोखण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे गुजरात ते महाराष्ट्र पसरलेले मोठे रॅकेट उघड झाले असून, आगामी काळात आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
