पुणे गुन्हेगारीत राज्यात प्रथम, देशात पाचवे:सुप्रिया सुळेंनी गृहखाते व 'लाडकी बहीण' योजनेवरून सरकारला घेरले
![]()
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे काँग्रेस भवनात काँग्रेस नगरसेवकांशी संवाद साधला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर गंभीर आरोप केले. पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ही भेट दिली. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्रीकांत पाटील रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांची मते निर्णायक ठरणार असल्याने, सुळे यांनी 16 नगरसेवकांशी संवाद साधून पाठिंब्याबद्दल आभार मानले. पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, पुणे हे गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिल्या तर देशात पाचव्या क्रमांकावर आहे, असे त्यांनी सांगितले. हडपसर येथील विषारी दारूच्या दुर्घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, पुण्यात गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. या अपयशाची जबाबदारी निश्चित करत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना तात्काळ सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहविभागाकडे केली. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांवरून सरकारवर टीका ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरही सुप्रिया सुळे यांनी बोट ठेवले. सरकारने सुरुवातीला 2.38 कोटी महिलांना लाभ दिल्याचा दावा केला होता, परंतु सुधारित आकडेवारीनुसार 1.25 कोटींहून अधिक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. हा महिलांचा विश्वासघात असल्याचा आरोप सुळे यांनी केला. काँग्रेसमुक्त भारत’वरून भाजपला टोला भाजपच्या राजकीय धोरणावर टीका करताना त्या म्हणाल्या की, भाजपचे नेते नेहमी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा द्यायचे, पण आज त्यांनी संपूर्ण काँग्रेस पक्षच स्वतःमध्ये सामावून घेतल्यामुळे आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’ तयार झाली आहे. ज्या मूळ भाजप कार्यकर्त्यांनी पक्षासाठी लाठ्या खाल्ल्या आणि संघर्षाच्या काळात सतरंज्या उचलल्या, त्यांना आज बाजूला सारले गेले असून प्रकाश जावडेकरांसारखे ज्येष्ठ नेते आज कुठे आहेत? असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर पोलिस आयुक्तांचा खुलासा:9 पानांच्या पत्रातून गुन्हेगारी घटल्याचा दावा; जाहीर केली अधिकृत आकडेवारी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे पोलिस प्रशासन यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. पुणे हे गुन्हेगारांचे केंद्र बनत चालले आहे, असा गंभीर आरोप करत सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देताना अमितेश कुमार यांनी 9 पानांचे सविस्तर पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रात त्यांनी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी होत असल्याचा दावा करत अधिकृत आकडेवारीच समोर ठेवली आहे. वाचा सविस्तर
