इतिहासातील चुका टाळा:ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे आवाहन, ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि 'हर घर सावरकर' संस्थेतर्फे व्याखानाचे आयोजन
![]()
ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी भारतीय समाजाने इतिहासातून बोध घेऊन भूतकाळातील चुका टाळाव्यात, असे प्रतिपादन केले. ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. तत्कालीन समाज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूने ठामपणे उभा न राहणे ही एक मोठी चूक होती, असेही त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या उभारणीमध्ये शहीद झालेल्या कारसेवकांची नावे अयोध्येत आणि इतिहासात कोरली जावीत, यासाठी आपण मोहीम हाती घेऊ, असे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले. या मोहिमेची सुरुवात बाणेर येथील सभेमधून होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. बाणेर येथील माऊली गार्डनमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सावरकर विचार दर्शनचे संपादक सात्यकी सावरकर, ‘हर घर सावरकर’चे गिरीश देशपांडे, ब्राह्मण सांस्कृतिक संघाचे उमेश फडके, उमा गाडगीळ आणि अस्मिता करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कुलश्रेष्ठ यांनी आपल्या व्याख्यानात हिंदु-मुसलमान संबंध, संविधान, सेक्यूलर संकल्पना, बाबरी मशीद आणि राम मंदिर, तसेच वंदेमातरम् गीत यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर आपले विचार मांडले. समाजात तथाकथित ‘बडे आदमीं’चे वाढते अनुकरण धोकादायक असून, त्यामुळे खरे आदर्श मागे पडतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनाविषयी बोलताना ते म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असे म्हणणे योग्य नाही, तर त्या दिवशी फक्त सत्तेचे हस्तांतरण झाले, हे वास्तव आहे. अहिल्यादेवी होळकरांनी श्री काशी विश्वेश्वर मंदिरातील पूजा पुन्हा सुरू करून संस्कृतीचे प्रवाहीपण अबाधित राखले. सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांसारख्या कृतीशील व्यक्तींची उदाहरणे समाजाने नेहमी समोर ठेवली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. सावरकर त्यांच्या काळात शंभर वर्षे पुढचा विचार करत होते, मात्र त्यांना समजून न घेतल्याने आजही त्यांचे नाव घेताना लोक कचरतात, असे कुलश्रेष्ठ म्हणाले. मतदान करताना पक्ष, जात आणि फुकटेगिरी यापलीकडे जाऊन सूज्ञ विचार करणे आवश्यक आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी आणि त्यामागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुत्सद्देगिरी व धोरणीपणा समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आजही जग युद्धग्रस्त असताना मोदींनी कृतीशील मौनाचा आदर्श निर्माण केला आहे, असेही ते म्हणाले.
