एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार!:बच्चू कडू यांचा निर्धार; कर्जमाफीत फसवणूक झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा सरकारला इशारा

0
db-temp-cover-marathi-2026-06-08t122519654_1780902073.jpg




नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावर बोलताना बच्चू कउू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत. आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात अधिवेशनात तसेच थेट रस्त्यावर लढायला तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत २० हून अधिक सभा घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी आगामी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, “प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही भावना असणे स्वाभाविक आहे. आमचीही इच्छा आहे की ‘देवाभाऊंचे’ वरच्या पदावर प्रमोशन व्हावे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत. गेल्या १५-२० दिवसांत आम्ही विदर्भाचा दौरा केला आहे, येथील जनता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभी राहून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल, अशी मला खात्री आहे. यासाठी शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही.” शेतकरी आत्महत्येवरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. विदर्भातील नेतृत्व मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री पदावर असतानाही या भागात दररोज १० ते १५ शेतकरी आत्महत्या करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “विदर्भातील मुख्यमंत्र्यांकडून या भागाला ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. सरकार कामच करत नाही असे आमचे म्हणणे नाही; नदीजोड प्रकल्पातून पाणी जेव्हा यायचे तेव्हा येईल, पण आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे,” असे कडू म्हणाले. कर्जमाफीत दुरुस्ती करा, नाहीतर लढाई अटळ! शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडू यांनी नागपुरात मोठे जनआंदोलन केले होते, ज्यावर सरकारने पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता सरकारकडून शेतकऱ्यांची बोळवण होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “कर्जमाफीत शेतकऱ्यांची पूर्ण फसगत होत आहे असे नाही, अनेकांना लाभही मिळत आहे. मात्र, योजनेत काही तातडीच्या दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. या दुरुस्त्यांसाठी आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. चालू अधिवेशनातही आम्ही हा आवाज उठवू आणि तरीही सरकारने निर्णय घेतला नाही, तर आम्ही थेट रस्त्यावर उतरून लढायला तयार आहोत.” विमानतळ निमंत्रण पत्रिकेच्या वादावर शिंदेंची घेतली बाजू नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याच्या वादावरही बच्चू कडू यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे यांना जेवढे डावलण्याचा प्रयत्न केला जाईल, तेवढे ते अधिक वेगाने लोकांच्या मनात घर करतील. तुम्ही त्यांचे नाव पत्रिकेवर लिहा अथवा लिहू नका, एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील नेते आहेत,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंची पाठराखण केली. आम्हीही स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहोत बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत एक विधान केले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झाला होता. त्यामुळे दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे, तर आम्हीही तयारी करत आहोत, असे ते म्हणाले. बच्चू कडूंच्या मागणीवर उदय सामंतही थेट बोलले दरम्यान, आमदार बच्चू कडू यांच्या या विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी असेल, ती वैयक्तिक आहे. मात्र ही मागणी स्वाभाविक मागणी आहे. माझीही मागणी आहे की, शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. जशी भाजपची मागणी असते देवेंद्र फडणवीस व्हावे, तशीच आमची मागणी असते. बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंती करायची होत्या त्या केल्या आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *