लाडकी बहीण योजनेत 81 लाख अपात्र लाभार्थी:दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून वसुली करा, काँग्रेसची मागणी

0
1f8f9fab-14d3-4ec5-a5c4-a382ac34ca35_1780322497848.jpg




मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८१ लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. त्यांची नावे नुकतीच वगळण्यात आली असून, या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकीपूर्वी अपात्र अर्जदारांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान वाटप करून राज्याच्या तिजोरीची लूट करणाऱ्या संबंधित मंत्रालयातील सचिव आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून राज्याचा बुडालेला पैसा वसूल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी या योजनेतील अनियमिततेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी फायदेशीर ठरलेल्या या योजनेत अपात्र महिलांना दरमहा १५०० रुपये वाटप करण्यात आले होते. आता अपात्र महिलांची नावे वगळल्यामुळे राज्याचे दरमहा १,२०० कोटी रुपये वाचणार असल्याचे समोर आले आहे. तिवारी यांनी प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या महिला-बालविकास आणि अर्थ मंत्रालयाने आता ८१ लाख अर्जदारांची अपात्रता निश्चित केली, त्यांना अर्ज मंजूर करताना आणि पैसे वाटप होईपर्यंत ही बाब का समजली नाही, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीपूर्वी सुमारे १८ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर बोजा राज्याच्या तिजोरीवर का टाकला गेला आणि या महसुली लुटीची कायदेशीर जबाबदारी कोणाची, असे संतप्त प्रश्न तिवारी यांनी विचारले आहेत. निवडणूक संपल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, पात्रतेच्या अटीबाहेरील अनेक जणांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ६५ वर्षांवरील सुमारे १२ हजार महिला आणि सुमारे १५ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांनी बेकायदेशीरपणे या योजनेचा लाभ घेतला. करदात्यांच्या पैशांवर दरोडा टाकणाऱ्या अशा सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या शपथेचे उल्लंघन केले असून, ही राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे तिवारी म्हणाले. महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, राज्यपाल आणि उच्च न्यायालयाने या ‘महसुली लुटीची’ गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दोषी आणि भ्रष्ट सचिव व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि त्यांची नावे उघड करून प्रतिमेची धिंड काढतील, असा निर्वाणीचा इशाराही गोपाळ तिवारी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *