विधान परिषद निवडणुकीत विदर्भात बंडखोरी; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह:महायुती-मविआत धुसफूस, उमेदवारांचे भवितव्य गुप्त डावपेचांवर

0
36b2e09e-f35d-4c9f-a263-b7ed9fddf469_1780321113986.jpg




स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद, बंडखोरी आणि शह-काटशहाचे राजकारण दिसून आले. यामुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ संख्याबळाची राहिलेली नाही, तर ती अंतर्गत राजकारणाची बनली आहे. अमरावतीमध्ये शिंदे गटाची बंडखोरी, भंडारा-गोंदियामध्ये नाना पटोले यांनी निर्माण केलेला सस्पेन्स, नागपुरात बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अयशस्वी होणे आणि चंद्रपुरातील ‘नॉट रिचेबल’ नाट्य या प्रमुख घडामोडी आहेत. ४ जून रोजी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच विदर्भातील खरी राजकीय स्थिती स्पष्ट होईल. अमरावती मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. त्यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजोरिया यांना उमेदवारीचा शब्द दिला होता, परंतु ही जागा भाजपकडे गेल्याने त्यांनी बंड पुकारले. याशिवाय, अमरावतीचे महत्त्वाचे नेते आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांची नाराजी कायम असल्याचे समोर आले आहे. प्रवीण पोटे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी राणा दाम्पत्याची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. ही नाराजी आणि बाजोरियांची बंडखोरी भाजपसाठी जिल्ह्यात आव्हानात्मक ठरू शकते. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. महायुतीकडून भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन उमेदवार मैदानात उतरवून राजकीय गूढता वाढवली आहे. काँग्रेसकडून अर्जुनी मोरगावचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी ‘एबी’ फॉर्मसह अधिकृत अर्ज भरला, तर प्रफुल्ल अग्रवाल यांनी काँग्रेस समर्थित उमेदवार म्हणून दुसरा अर्ज दाखल केला. “महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण हे ४ जून रोजी स्पष्ट होईल,” असे सांगत नाना पटोले यांनी विरोधकांना संभ्रमात टाकले आहे. याशिवाय, भाजपच्या एका नाराज माजी जिल्हाध्यक्षाच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे महायुतीमधील अंतर्गत कलह समोर आला आहे, ज्यामुळे या मतदारसंघातील चुरस आणखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *