Ladki Bahin Yojana | 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार का? आदिती तटकरेंनी दिली माहिती
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुमारे 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची चर्चा राज्यभर रंगली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत लाभार्थ्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Nationalist Congress Party Sharad Pawar Group) ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लाडकी बहीण योजनेतील मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता त्याच योजनेतील लाखो महिलांना लाभापासून वंचित करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यावर वाढत चाललेला आर्थिक ताण, वाढती वित्तीय तूट आणि जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम यामागे असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. 80 लाख महिलांना अपात्र ठरवल्यानंतर पुढील काळात आणखी लाभार्थ्यांना विविध कारणे देऊन वगळले जाऊ शकते आणि अखेरीस योजना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
Ladki Bahin Yojana | आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण काय? :
या आरोपांनंतर आदिती तटकरे यांनी योजनेतील कोणाचाही अर्ज थेट रद्द करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, लाभार्थ्यांची माहिती विविध शासकीय विभागांकडून पडताळणीसाठी प्राप्त झाली असून पात्रता निकषांशी विसंगती आढळलेल्या प्रकरणांमध्ये लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. वय आणि उत्पन्नाच्या अटी पूर्ण न करणारे अर्जदार, वाहन नोंदणी असलेले लाभार्थी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या काही महिलांची माहिती संबंधित विभागांनी उपलब्ध करून दिली आहे.
याशिवाय अनेक लाभार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे, ज्यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही आणि तरीही लाभ बंद झाला आहे किंवा इतर योजनांसह त्यांचाही लाभ थांबला आहे, त्यांनी तातडीने महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. अशा सर्व प्रकरणांची नव्याने पडताळणी करून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही आदिती तटकरे यांनी दिली.
