NEET Paper Leak | नीट पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला मोठा दणका! पी.व्ही. कुलकर्णीच्या 4 मजली इमारतीवर बुलडोझर
NEET Paper Leak | संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने (CBI) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्या बीड (Beed) येथील बेकायदा इमारतीवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.
शाहू नगरमधील चार मजली इमारतीवर कारवाई
देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या घोटाळ्याचे धागेदोरे नाशिक (Nashik), पुणे (Pune), लातूर (Latur) आणि बीडपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी पी. व्ही. कुलकर्णी हा मूळचा बीडचा रहिवासी असून, शहरातील शाहू नगर (Shahu Nagar) परिसरात त्याची एक चार मजली इमारत आकारास येत होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्याला अटक केल्यानंतर, स्थानिक पालिका प्रशासनाने या बांधकामाच्या कायदेशीर बाबींची पडताळणी केली.
सदर इमारतीचे काम बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्याने, प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला स्वतःहून हे बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. या नोटिशीची मुदत आज संपल्यामुळे शेवटी या इमारतीवर हातोडा चालवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाची कठोर कारवाई टाळण्यासाठी खुद्द ठेकेदारानेच या वास्तूचा अनधिकृत भाग पाडण्यास सुरुवात केली असून, यामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
प्लॅटिनम गोल्ड बॅच आणि सीबीआयचा तपास
या संपूर्ण रॅकेटचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणेने लातूर येथील आरसीसी क्लासेसचे (RCC Classes) प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तपासादरम्यान अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, कुलकर्णी हा लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या फ्लॅटवर खासगी शिकवण्या घेत असे. यापूर्वी मोटेगावकर यांच्या संस्थेत ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’ (Platinum Gold Batch) नावाने एक विशेष वर्ग चालवला जात होता, ज्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची भरभक्कम फी उकळली जात असे. सध्या तपास अधिकारी कुलकर्णी, मोटेगावकर आणि शिरुरे यांच्यातील आर्थिक लागेबांध्यांचा सखोल तपास करत आहेत.
चार वर्षांपूर्वी नोकरीतून निवृत्त झालेला कुलकर्णी हा लातूरच्या कैलासनगर (Kailasnagar) भागात वास्तव्यास होता, तर त्याचे कुटुंबीय पुण्यात राहतात. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे या महिलेच्या तो सतत संपर्कात होता. याच महिलेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथक लातूरपर्यंत पोहोचले आणि त्यांनी कुलकर्णीच्या मुसक्या आवळल्या. या अटकेनंतरच पेपरफुटीच्या या मोठ्या जाळ्याचा हळूहळू उलगडा होत असून या घोटाळ्यातील इतरही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
News Title: NEET Paper Leak Mastermind PV Kulkarnis Property Demolished
