मोहोळमधील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत:24 हजार हेक्टरवरील खरिपाची पेरणी खोळंबली‎, बियाणे विक्रेते हवालदिल

0
250_17808338096a255e111cf78_17396836915.jpg




गतवर्षी मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता, गतवर्षी मे महिन्यात तालुक्यात २१३.१० मीमी पाऊस झाला होता. मात्र यावर्षी १ जून उजाडला तरी अद्याप पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांसह बियाणे विक्रेते हवालदिल झाले आहेत. गतवर्षी मे महिन्यातच वरून राजाने दमदार हजेरी लावत मोहोळ तालुक्यात शेतात पाणी पाणी केले होते. यंदा मात्र आकाशात फक्त काळे ढग जमा होऊन फक्त सोसाट्याचा वाराच सुटत आहे. यावर्षी तापमानाने चाळीशी पार केल्याने माणसांसह पशुधन, फळबागा आणि पिकानाही तो जाचक ठरत असून पाण्यात उभी असणारी पिके, फळबागाही दुपारी कोमेजलेल्या दिसून येत आहेत. उन्हामुळे जनावरे दूध कमी देऊ लागली आहेत. तालुक्यातून गेलेल्या उजनीच्या डाव्या कालव्याला सुटलेल्या पाण्याच्या आवर्तनाचा चांगला आधार ऊस आणि फळबागांना होता मात्र आता त्याचेही पाणी गेल्यात जमा आहे. यात आणखी भर म्हणजे महावितरणने गत कांही दिवसांपासून अवघा ५,६ तासच थ्रीफेज वीजपुरवठा सुरू ठेवल्याने पिकांना पाणी असूनही व्यवस्थित देता येईना झाले आहे. मोहोळ तालुका तसा रब्बीचा म्हणून ओळखला जातो मात्र तालुक्यात आता कृषी विभागाच्या नियोजन आणि मार्गदर्शनाने खरिपाचेही क्षेत्र वाढत चालले आहे. मका, सोयाबीन, तूर, कांदा, या खरीप पिकांची मोठी प्रमाणावर लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात २४ हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाच्या लागवडीसाठी उपलब्ध आहे. तालुक्यातील २५२ बी-बियाणे, खते औषधे आदी कृषी सेवा केंद्रांतून दुकानदारांनी गत वर्षीच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीच्या अनुभवावरून यावर्षी बियाणे, औषधे विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवली आहेत मात्र मे महिना लोटला, रोहिणी नक्षत्रही कोरडे गेले, पावसाने दडी मारल्याने तेही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खरिपासाठी पाऊस पडणे अत्यंत गरजेचे‎ गतवर्षी मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या दिवसांत शेतातून पाणी वाहत होते, यंदा रोहिणी नक्षत्र संपले, जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. वाढते तापमान आणि जोरदार सुटणाऱ्या वाऱ्याने शेतातील उसासह उभी असणारी मका, भाजीपाला पिकं, फळबागा भेलकांडु लागली आहेत. डाळींब बागेचा बहार धरला असून फळे लिंबाच्या आकाराहून मोठी झाली आहेत . त्यामुळे पाऊस पडणे अत्यंत गरजेचे आहे. – बाळासाहेब टेकळे (शेतकरी, पापरी) ३ टन मका बियाणे विक्रीस उपलब्ध‎ गतवर्षी पडलेल्या पावसाच्या अंदाजावरून दुकानात यंदा तीन टन मका बियाणे विक्रीस उपलब्ध केले आहे, पण पावसाने दडी मारल्याने शेतकरी इकडे फिरकेना झाला आहे. पाऊस वेळेवर आणि भरपूर नाही पडला तर यावर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. – सुलतान मुलाणी, पापरी (बी-बियाणे, खत विक्रेते) तालुक्यात ऊस पिकासोबतच भाजीपाला, फुल शेती, केळी, द्राक्ष, पेरू आदी फळबागांचेही क्षेत्र मोठ्याप्रमाणावर आहे. दरवर्षी यांत वाढ होत असते मात्र पावसाने ओढ दिल्याने उसासह फळबागा भाजीपाला तसेच फुलशेती पिकांच्या लागवडी खोळंबल्या आहेत. डाळींब, पेरू आदी फळबागांचे अनेक शेतकऱ्यांनी बहार धरले आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली असून फक्त पावसाची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed