नाइट लँडिंगचे कारण देत गोव्याचे विमान 3 महिने बंद:हैदराबादच्या विमानाला सूर्यास्ताची अडचण पण गोव्याच्या उड्डाणावरही बंदी
![]()
सोलापूर-गोवा आणि सोलापूर- हैदराबाद ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सचे एकच विमान आहे. हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेकऑफ करणे कठीण आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबादसह गोव्याचीही विमानसेवा २० जूनपासून पुढील ३ महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादसाठी नाइट लँडिंगची अडचण असू शकेल, पण गोवा विमानाची वेळ दुपारची असतानाही कंपनीने विमानाचे डेस्टिनेशन रोटेशन पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगत ही सर्वाधिक प्रतिसाद असलेली विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय लादला आहे. दरम्यान, पावसाळ्यानंतर नवीन बंगळुरू, तिरुपती आणि नागपूर या नव्या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी सांगितले. सोलापुरातील विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. पावसाळ्यात खराब हवामानामुळे विमानाला विलंब झाल्यास, सूर्यास्तानंतर लँडिंग किंवा टेक- ऑफ करणे धोक्याचे ठरू शकते. सुरक्षेच्या कारणास्तव एअरलाइन्सने हा निर्णय घेतला आहे. गोवा-सोलापूर- हैदराबाद आणि पुन्हा परतीचा प्रवास असे एकाच विमानाचे रोटेशन आहे. हैदराबादसाठी सध्या संध्याकाळचे स्लॉट उपलब्ध आहेत. हवामानामुळे तिथे थोडाही विलंब झाल्यास संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. सोलापूरमध्ये सूर्यास्तानंतर विमान उतरवता येत नाही. याच तांत्रिक कारणामुळे दुपारची गोव्याची फ्लाइट असूनही ती रोटेशनचा भाग असल्याने बंद ठेवावी लागत असल्याचे चाको म्हणाले. दरम्यान, सुमारे वर्षभर चांगला प्रतिसाद असलेल्या या विमानसेवेत खंड पडू नये, अशी मागणी केली जात आहे.
