कुलगुरू ई-बाईक, कुलसचिव आले सायकलने:विद्यापीठाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मिळाला पर्यावरण स्नेही प्रतिसाद‎

0
240_17801441226a1ad7fa2fff6_vconvehicle.jpg




पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत, शनिवारी ३० मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘नो व्हिकल डे’ (वाहनमुक्ती दिन) पाळण्यात आला. त्यामुळे कुलगुरु ई-बाईकने तर कुलसचिव हे सायकलने प्रवास करित कार्यालयात दाखल झाले. दर शनिवारी नो व्हेईकल डे पाळण्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच केली होती. त्या घोषणेनुसार ही कृती करण्यात आली. दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखत प्रदुषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद दिला. या मोहिमेचे नेतृत्व स्वत: विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. ‘नो व्हिकल डे’चे औचित्य साधत कुलगुरू डॉ. बारहाते हे आपल्या घरातून थेट विद्यापीठ कार्यालयात ई – बाईकने दाखल झाले, तर तिकडे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्यासह वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सायकल चालवत आपापली कार्यालये गाठली. परिणामी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते प्रशासकीय इमारतीपर्यंत आज नेहमीसारखा गाड्यांचा आवाज आणि धूर नव्हता, तर सायकलची घंटी आणि पर्यावरण रक्षणाचा उत्साह पाहायला मिळाला. या अभियानाबद्दल प्रतिक्रिया देताना कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे आवाहन केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला सुदृढ पर्यावरण देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत. दरम्यान विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. बहुतांश कर्मचाऱ्यांनी वाहतुकीसाठी सायकल व ई-बाईकचा वापर केला, तर काहींनी ‘कार पुलिंग’ पद्धत अवलंबली. यामुळे विद्यापीठ परिसर पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि शांत दिसत होता. विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकारामुळे शहरात आणि शैक्षणिक वर्तुळात भरभरून कौतुक होत आहे. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन केले की, देशाच्या विकास कार्यात आपले योगदान देण्यासाठी आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठाप्रमाणेच महाविद्यालयांमध्ये सुद्धा महिन्याच्या दर शनिवारी नो व्हिकल डे पाळण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed