नागपुरात डीजे बंदीचा फज्जा!:पोलिसांच्या उपस्थितीतच दहीहंडीला लेझर आणि डीजेचा दणदणाट; भाजप नेत्यांमध्येच जुंपली

[ads1]


महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात डीजेवरील बंदीच्या आदेशावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सच्या वापरावर निर्बंध घातले असतानाही बडकस चौकात दहीहंडी उत्सवासाठी डीजे वाजवण्यात आल्याचे समोर आले आहे. डीजेचा आवाज तुलनेने कमी ठेवण्यात आला असला, तरी बंदी असताना डीजेचा वापर झाल्याने पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. नागपुरातील बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाला सुरुवात होताच गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचण्यास सुरुवात केली. यावेळी डीजेसोबत तीव्र प्रकाशाच्या लाईट्सचाही वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. पोलिसांकडून ध्वनीची पातळी तपासली जात असून, नियमांचे उल्लंघन होत आहे का, यावर लक्ष ठेवले जात आहे. बंदीच्या आदेशानंतरही डीजेचा वापर नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 3 सप्टेंबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या काही प्रकारच्या वापरावर निर्बंध लागू केले आहेत. या आदेशामध्ये डीजे साउंड सिस्टीम, डीजे वाहने, डॉल्बी, प्लाझ्मा साउंड, प्रेशर मिड सिस्टीम, बदल केलेल्या ध्वनिव्यवस्था तसेच बीम आणि लेझर लाईट्सचा समावेश आहे. गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका तसेच आगामी विविध धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषण, लेझर आणि तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा धोका, तसेच डीजे वाहनांमुळे अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता यांचा विचार करून पोलिसांनी हे निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बडकस चौकातील दहीहंडीमध्ये डीजेचा वापर झाल्याने आता या आदेशाची अंमलबजावणी कशी केली जाते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आवाज 80 ते 82 डेसिबलपर्यंत बडकस चौकात डीजेचा आवाज नेहमीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. मात्र, डीजे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला नव्हता. सायंकाळी दहीहंडी कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर संगीत सुरू करण्यात आले. पोलिसांकडून कार्यक्रमस्थळी ध्वनीची पातळी मोजली जात असल्याची माहिती आहे. सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास आवाजाची पातळी 80 ते 82 डेसिबलपर्यंत नोंदवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. डीजेचा आवाज कमी ठेवण्यात आला असला, तरी पोलीस आयुक्तांच्या बंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर डीजेचा वापर करता येतो का, हा मुख्य प्रश्न आहे. गोविंदांच्या थरांनी उत्साहाला उधाण बडकस चौकात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि गोविंदा पथके दाखल झाली आहेत. डीजेच्या तालावर गोविंदांनी मानवी मनोरे रचण्यास सुरुवात केली. त्यासोबतच कार्यक्रमस्थळी तीव्र प्रकाश देणाऱ्या लाईट्सचा वापर करण्यात आला. एकीकडे दहीहंडीचा उत्साह आणि दुसरीकडे डीजेवरील बंदी, यामुळे बडकस चौकातील कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. भाजपमध्येच डीजे बंदीवर मतभेद नागपुरातील डीजे बंदीवरून राजकीय मतभेदही समोर आले आहेत. भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजेवरील निर्बंधांचे समर्थन केले आहे. मात्र, भाजप आमदार प्रवीण दटके यांनी या बंदीला विरोध करत ती मागे घेण्याची मागणी केली आहे. दटके यांनी हिंदू सणांच्या काळातच डीजेवर निर्बंध का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे नागपुरात डीजेच्या मुद्द्यावर भाजपमध्येही वेगवेगळ्या भूमिका असल्याचे चित्र आहे. डीजे बंदी केवळ दोन महिन्यांची नको माजी आमदार संदीप जोशी यांनी मात्र डीजेवरील निर्बंध कायमस्वरूपी असावेत, अशी भूमिका मांडली आहे. ही आपली वैयक्तिक भूमिका असली तरी ती केवळ स्वतःची नसून नागरिकांच्या भावनेशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जोशी यांच्या मते, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना होतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न केवळ एखाद्या सणापुरता मर्यादित ठेवता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे. 20 ते 25 गणेश मंडळांनी डीजे न वापरण्याचे हमीपत्र दिल्याचा दावा संदीप जोशी यांनी आपल्या भूमिकेला समर्थन देताना काही गणेशोत्सव मंडळांनी डीजेचा वापर न करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले आहे. जवळपास 20 ते 25 मंडळांनी आपल्याला हमीपत्र दिल्याचा त्यांचा दावा आहे. ही मंडळे डीजेचा वापर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याचे जोशी यांनी सांगितले. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मंडळांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष नागपुरात एकीकडे पोलीस आयुक्तांनी स्पष्टपणे डीजे आणि लेझरवर निर्बंध घातले आहेत, तर दुसरीकडे दहीहंडीच्या कार्यक्रमात डीजे आणि प्रकाशयंत्रणा वापरली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. बडकस चौकात पोलीस उपस्थित असून ध्वनीची पातळीही मोजली जात आहे. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास पुढे काय कारवाई केली जाते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. डीजे बंदीचा आदेश, धार्मिक उत्सवातील पारंपरिक जल्लोष, नागरिकांचे ध्वनी प्रदूषणापासून संरक्षण आणि नियमांची समान अंमलबजावणी या चारही मुद्द्यांमुळे नागपुरातील दहीहंडीचा हा कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरला आहे. हेही वाचा… दर 6 महिन्यांनी रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची घोषणा; छत्रपती संभाजीनगर दुर्घटनेनंतर सरकारचा निर्णय राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसह कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करता यावी, यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे नियमित अग्निसुरक्षा परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील 4 दिवसांत ही कार्यपद्धती जारी केली जाणार असून, त्यानंतर दर 6 महिन्यांनी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *