किशोर रिठे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार:'सातपुड्याचा सातबारा' ग्रंथासाठी शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मान
![]()
अमरावती येथील ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांना महाराष्ट्राची आद्य साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठित शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित एका समारंभात अभिनेता हृषीकेश जोशी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन २०२५ मधील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये किशोर रिठे यांच्या ‘सातपुड्याचा सातबारा’ या ग्रंथास ‘लक्षवेधी साहित्य ग्रंथ’ म्हणून गौरवण्यात आले. या पुस्तकाला यापूर्वी एका नामवंत माध्यम समूहाचाही पुरस्कार मिळाला आहे. किशोर रिठे सध्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक म्हणून कार्यरत आहेत, जी भारतातील वन्यजीव क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. त्यांनी संपूर्ण सातपुडा पर्वतराजीत तब्बल ३५ वर्षे वने व वन्यजीव संरक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवावर आधारित ‘सातपुड्याचा सातबारा’ हा ६४७ पानांचा ग्रंथ २०२५ मध्ये पुण्याच्या पदमगंधा प्रकाशनाने प्रकाशित केला. या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना किशोर रिठे म्हणाले की, “हा पुरस्कार खऱ्या अर्थाने सातपुडा पर्वतराजीचा असून, आपण फक्त त्याच्या विविध पैलूंना आपल्या परीने या ग्रंथात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.” त्यांनी यापूर्वी ‘रानावनाचे मूडस’ आणि ‘हिरवा संघर्ष’ ही मराठी पुस्तके, तर ‘सातपुडा’ आणि ‘डस्क टू डॉन: अ स्टोरी ऑफ व्हीलेज रिसेटलमेंट इन मेलघाट’ ही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. ते यापूर्वी जळगाव येथे भरलेल्या पर्यावरण विषयक साहित्य संमेलनाचे अध्यक्षही राहिले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (मसाप) ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असून, गेल्या १२० वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत आहे. कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली, लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर आणि इतर थोर साहित्यिकांच्या उपस्थितीत १९०६ साली या संस्थेची स्थापना झाली होती. संस्थेतर्फे दरवर्षी लेखक व कवींना त्यांच्या उत्कृष्ट पुस्तकांसाठी साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
