कुलगुरू ई-बाईकने, कुलसचिव सायकलने कार्यालयात:अमरावती विद्यापीठात 'नो व्हिकल डे'ला पर्यावरणस्नेही प्रतिसाद

0
8655e274-fdd7-4bc0-8ad5-c9e4ecc592cf_1780154775056.jpg




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘नो व्हिकल डे’ पाळण्यात आला. शनिवारी, ३० मे रोजी कुलगुरू ई-बाईकने तर कुलसचिव सायकलने कार्यालयात दाखल झाले. विद्यापीठाने यापूर्वीच दर शनिवारी ‘नो व्हिकल डे’ पाळण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पर्यावरणाचा समतोल राखत प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोहिमेचे नेतृत्व कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी स्वतः केले. डॉ. बारहाते ई-बाईकने विद्यापीठात पोहोचले. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्यासह वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायकल चालवत आपली कार्यालये गाठली. यामुळे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते प्रशासकीय इमारतीपर्यंत नेहमीप्रमाणे वाहनांचा आवाज आणि धूर नव्हता. त्याऐवजी सायकलची घंटी आणि पर्यावरण रक्षणाचा उत्साह दिसून आला. या अभियानाबद्दल बोलताना कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते म्हणाले की, “पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे आवाहन केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, ते आपल्या जीवनशैलीचा भाग बनले पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला सुदृढ पर्यावरण देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत.” विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. बहुतांश कर्मचाऱ्यांनी वाहतुकीसाठी सायकल व ई-बाईकचा वापर केला, तर काहींनी ‘कार पुलिंग’ पद्धत अवलंबली. यामुळे विद्यापीठ परिसर पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि शांत दिसत होता. विद्यापीठाच्या या पुढाकाराचे शहरात आणि शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन केले आहे की, देशाच्या विकास कार्यात योगदान देण्यासाठी आणि समाजासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठाप्रमाणेच महाविद्यालयांमध्येही दर महिन्याच्या शनिवारी ‘नो व्हिकल डे’ पाळण्यात यावा. याबाबत संबंधित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना अवगत करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed