दर्यापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न:जिद्द असल्यास कोणत्याही परिस्थितीत करियर घडवता येते – प्रा. सागर भस्मे

0
d70d03ab-3966-4a8f-af45-696096d29d99_1780154110505.jpg




दर्यापूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भ आयएएस अकादमीचे संचालक प्रा. सागर देवेंद्र भस्मे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते आपले करियर घडवू शकतात. प्रा. भस्मे यांनी स्पर्धा परीक्षेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे प्राथमिक ज्ञान असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. केवळ पुस्तकी ज्ञान आत्मसात न करता, विविध प्रकारची अद्ययावत माहिती संकलित करून अभ्यास करणे आवश्यक आहे. करियरसाठी अनेक संधी उपलब्ध असून, आपल्याला आवडणारे क्षेत्र निवडले पाहिजे, असेही ते म्हणाले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी बहुजन राष्ट्र निर्माण प्रशासकीय अकादमीचे संचालक प्रा. गजानन कोरे होते. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, आयटी व डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील पियूष वैराळे, रोशन पडोळे, सुप्रसिद्ध रीलस्टार विशाल पिसाट, तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्रा. अंकुश अरबट, प्रा. अंकुश अब्रक आणि प्रा. राजेश तायडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. गजानन कोरे यांनी यावेळी बोलताना दर्यापूर शहरात १९९५ मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू केल्याची आठवण करून दिली. त्यावेळी दर्यापूर तालुक्यातील सुधीर देशमुख हे पोलीस निरीक्षक पदावर विराजमान होणारे पहिले व्यक्ती ठरले होते, असे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी महिलांच्या योगदानावर भर दिला. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यामुळे प्रशासकीय सेवेतही महिलांची संख्या वाढली पाहिजे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महिला निश्चितच चांगले कार्य करू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी जेवढी मेहनत लागते, त्यापेक्षा जास्त मेहनत आणि संघर्ष अधिकारी पदावर विराजमान झाल्यावरही करावा लागतो, असे सांगितले. प्रत्येक अधिकाऱ्याला कठोर निर्णय घेणे आवश्यक असते, त्यासोबतच माणुसकीही जपायला हवी, असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमादरम्यान दर्यापूर शहरात कार्यरत असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला. नुकताच केंद्रीय सेवेत रुजू झालेल्या शुभम मेश्राम या युवकाचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक तथा सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आशिष देशमुख यांचा सहपत्नी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. धनंजय देशमुख यांनी केले, तर राजश्री देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed