जिपकाटे दाम्पत्याला प्रशासकीय सेवेसाठी 'राष्ट्ररत्न' पुरस्कार:हेमंत काळमेघ यांच्या हस्ते सन्मान, सामाजिक कार्याची दखल
![]()
वडनेर गंगाई येथील अक्षय भगवानराव जिपकाटे आणि त्यांच्या पत्नी प्रिया अक्षय जिपकाटे (अंकुरकर) यांना ‘प्रशासकीय सेवेतील राष्ट्ररत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. अक्षय जिपकाटे हे मृदा व जलसंधारण विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर प्रिया जिपकाटे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता आहेत. येवदा येथे आयोजित एका कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत या दांपत्याने शासकीय सेवेत उच्च पदाला गवसणी घातली आहे. अक्षय जिपकाटे यांनी गरिबीशी संघर्ष करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आणि वर्ग-२ चे राजपत्रित अधिकारी बनले. या प्रवासात त्यांना त्यांची पत्नी अभियंता प्रिया जिपकाटे यांची खंबीर साथ मिळाली. प्रशासकीय सेवेत कार्यरत असतानाही जिपकाटे दांपत्याने आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षित होऊन स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनावे, यासाठी ते सतत शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात योगदान देत असतात. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ‘स्वयंम मल्टीपर्पज फाउंडेशन’ने या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी जिपकाटे दांपत्याच्या संघर्षाचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले, तसेच हा सन्मान ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
