चांदूरबाजारमध्ये काँग्रेसचे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन:गॅस दरवाढ, नीट पेपरफुटी प्रकरणी तहसीलदारांना निवेदन
![]()
चांदूरबाजार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका शाखेने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, मे महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरांमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. या आंदोलनादरम्यान, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली संपूर्ण कर्जमाफी तात्काळ लागू करावी, अशी मागणीही निवेदनात होती. तसेच, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पक्षाने दिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरूद्ध ऊर्फ बबलूभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी विलासराव शेकार, डॉ. प्रताप किटुकले, निखिल काटोलकर, श्रेयस बर्वे, राजेंद्र बंड, मनोज देशमुख, विजय राऊत, भाई देशमुख, विनोदराव खवले, अंकुश देशमुख, भूषण देशमुख, अभिजीत सावरकर, गोपाल रडके, संविधान मोहोड, तेजस वानखडे, वासुदेव देशमुख, मंगेश देशमुख, राहुल वाटाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
