शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही:साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा – नितीन गडकरी

0
81d7b220-78a6-49fa-a28e-cd78d1eb8102_1780156856138.jpg




केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाता आणि इंधनदाता देखील आहे. साखर कारखान्यांनी यापुढे केवळ साखर उत्पादनावरच नव्हे, तर उपपदार्थ निर्मितीवरही अधिक भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) वतीने आयोजित साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) यावरील एक दिवसीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महासचिव पांडुरंग राऊत, खजिनदार महेश देशमुख आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले उपस्थित होते. यावेळी गडकरींच्या हस्ते विस्माच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. गडकरींनी पुढे सांगितले की, इथेनॉलची निर्मिती विविध स्रोतांपासून केली जात आहे. भविष्यात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यावर अधिक भर दिला जाईल आणि सरकार याबाबत विचार करत आहे. सर्व प्रकारची वाहने इथेनॉलवर चालावीत, असा प्रयत्न आहे. कचऱ्यापासून सीएनजी तयार होऊ शकतो, हे सिद्ध झाले असून कोणतीही गोष्ट वाया जाणार नाही, मात्र त्यासाठी कार्यक्षमता वाढवावी लागेल. साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही गडकरींनी दिली. या परिषदेत गडकरींच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यांना आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. दुपारच्या सत्रात साखर आणि उसापासून तयार होणाऱ्या सहपदार्थांची निर्मिती, ग्रीन हायड्रोजन, हवाई इंधन यावरील संशोधन, तसेच पेट्रोल, डिझेल, जैव इंधन निर्मिती आणि एआय तंत्रज्ञानाचा साखर उद्योगातील उपयोग या विविध विषयांवर चर्चा आणि सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, मध्यंतरीच्या सुमारे दहा वर्षांच्या काळात इथेनॉलचा वापर पूर्णपणे बंद होता. तसे झाले नसते तर आज आपण खूप पुढे गेलो असतो. कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली असली तरी, त्या तुलनेत ऊस उत्पादन किती वाढले, हंगामाचा कालावधी कमी होत आहे आणि साखर उतारा कमी होत आहे, या सर्व बाबींवर प्रत्यक्ष काम करणे आवश्यक आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत करावे, अशी साखर उद्योगाची मागणी आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, साखर उद्योगात यापुढील काळात नवीन तंत्रज्ञान आणि उपपदार्थ निर्मितीवर अधिक भर देण्याची गरज आहे. केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहता येणार नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष वळसे पाटील यांनी साखर उद्योगाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता सांगून ते म्हणाले की, साखर निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरणाची गरज आहे तसेच इथेनॉल दरात वाढ करण्यात यावी आणि ऊसाची एफआरपी आणि एमएसपी यामधील तफावत कमी करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed