रघुनाथ येमूल यांची निर्दोष मुक्तता:हायकोर्टाने केले सर्व आरोप रद्द; घरगुती हिंसाचार प्रकरणात मोठा दिलासा
![]()
पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड यांच्या घरगुती हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले रघुनाथ राजाराम येमूल (गुरुजी) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने येमूल यांची निर्दोष मुक्तता केली असून, त्यांच्यावरील महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत असलेले सर्व आरोप रद्द केले आहेत. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. नाना गायकवाड यांच्या सुनेने ३० जून २०२१ रोजी पती गणेश गायकवाड आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर १० जुलै २०२१ रोजी नोंदविलेल्या पुरवणी जबाबात, येमूल यांनी सुनेमध्ये ‘नकारात्मक शक्ती’ असल्याचे सांगून पतीला तिच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचा आरोप केला होता. या आधारे येमूल यांना आरोपी क्रमांक ९ म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेच्या अनेक त्रुटींवर बोट ठेवले. न्यायालयाने नमूद केले की, मूळ एफआयआरमध्ये येमूल यांचे नाव कुठेही नव्हते. एफआयआर दाखल झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी केवळ पुरवणी जबाबाच्या आधारे त्यांना आरोपी केले गेले. तसेच, इतर साक्षीदारांचे जबाब ऐकीव स्वरूपाचे असून त्यांनी येमूल यांना कोणतेही कृत्य करताना प्रत्यक्ष पाहिलेले नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, येमूल यांनी तक्रारदार सुनेची कधीही प्रत्यक्ष भेट घेतली नव्हती किंवा त्यांच्यात कोणताही थेट संवाद झालेला नाही. लिंबावर हळद-कुंकू ठेवण्याच्या कृतीचा थेट संबंध येमूल यांच्याशी जोडणारा कोणताही प्रत्यक्ष पुरावा पोलिसांकडे उपलब्ध नाही. तांत्रिक मुद्द्यांवरून राज्य सरकारने केलेला आक्षेप फेटाळत न्यायालयाने येमूल यांचा फौजदारी पुनरीक्षण अर्ज मंजूर केला. येमूल यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अमित देसाई, अॅड. अभिषेक आवचट आणि अॅड. सिद्धांत देशपांडे यांनी काम पाहिले. या निर्णयामुळे केवळ ऐकीव माहितीच्या आधारे गंभीर गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेवर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
