संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट:धनंजय देशमुख यांच्या साडूला सख्ख्या भावानेच दिली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-30t14_1780133111.png




मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या खटल्यातील एक प्रमुख साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर यांना साक्ष मागे घेण्यासाठी चक्क त्यांच्या सख्ख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. दादा खिंडकर हे मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. तसेच या प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदारही आहेत. आता त्यांना त्यांचा छोटा भाऊ समाधान खिंडकर यांनी साक्ष न देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, समाधान खिंडकर हे नुकतेच दादा खिंडकर यांच्या घरी आले होते. त्यांनी तिथे जुन्या वादाची खपली काढत दादा खिंडकला सांगितले की, तू धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस. संतोष देशमुख प्रकरणात साक्षही देऊ नकोस. उलट त्यांना हे प्रकरण मिटवून घ्यायला सांग. दादा खिंडकर यांची पोलिसांत तक्रार समाधान खिंडकर यांच्या या सूचनेमुळे दादा खिंडकर यांनी त्यांना या प्रकरणापासून दूर राहण्याचा व आपले काम करण्याचा सल्ला दिला. पण समाधान यांनी दादा खिंडकर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनाक्रमानंतर दादा खिंडकर यांनी तात्काळ शिवाजी नगर पोलिस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही यासंबंधी वेळ न दवडता तात्काळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. विशेष म्हणजे प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार दादा खिंडकर व आरोपी समाधान खिंडकर या दोन्ही भावांत गत अनेक दिवसांपासून कौटुंबिक व इतर कारणांवरून वाद सुरू आहे. यापूर्वी दादा खिंडकर यांच्यावरही काही तरुणांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाती साक्ष बदलण्यासाठी त्यांच्या लहान भावानेच त्यांना धमकी दिल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. पुढाऱ्याच्या मुलाचा विवाहितेवर बलात्कार उल्लेखनीय बाब म्हणजे बीड जिल्हा गत काही वर्षांपासून गुन्हेगारी कारवायांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. जिल्ह्यात गत आठवड्यातच एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उजेडात आली होती. पीडित महिला बीडच्या चऱ्हाटा रोड भागात राहत होती. सध्या ती नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे वास्तव्यास आहे. तिच्या तक्रारीनुसार, अमर बांगर नामक आरोपीने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. आरोपी अमर बांगर हा जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा निकटवर्तीय असणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्कार, खंडणी व गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed