पुण्यात जनगणना करणाऱ्या महिलेला मारहाण:10-12 जणांनी केला हल्ला; महापालिका आयुक्तांचे पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-30t13_1780126801.png




पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी पोलिसांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. देशासह राज्यात सध्या जनगणनेचे काम सुरू आहे. यासाठी शिक्षकांसह विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचारी प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन जनगणनेचे काम करत आहेत. पण आता हे कर्मचारी नक्की कोणते काम करत आहेत याची कल्पना नसल्यामुळे अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर एका महिला प्रगणकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून सदर महिला कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, सध्या ज्या भागात जनगणनेचे काम सुरू आहे, तिथे पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे. विशेषतः झोपडपट्टी भागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना पाठवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कारण, जनगणना करण्यासाठी आलेले कर्मचारी झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यासाठी आल्याचा गैरसमज नागरिकांचा होत आहे. जनगणना करताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे आपले घर पाडले जाईल, आपल्या घराची संपूर्ण माहिती महापालिकेकडे जाईल या भीतीने अनेक रहिवासी आपल्या कुटुंबाची पूर्ण माहिती प्रगणकांना देत नाही. हे नागरीक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. त्यातून वाद होऊन अनेकदा मारहाणीचे प्रसंग घडतात. त्यामुळे नागरिकांमध्ये जनगणनेविषयी जगजागृती करण्यात येणार आहे. या प्रकरणी नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे. जनगणनेच्या कामावर जाताना शिक्षिका ठार उल्लेखनीय बाब म्हणजे जनगणनेच्या शासकीय कामावर जाणाऱ्या दीपाली तांबे नामक महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे घडली होती. या प्रकरणी शिक्षक संघटनांनी जनगणनेच्या कामावरून सरकारवर टीकेची झोड उठवली होती. जनगणनेच्या कामावर जाताना झालेला हा आतापर्यंतचा चौथा मृत्यू आहे. यापूर्वी राज्यात अशा 3 घटना घडल्या होत्या. त्यात कोल्हापुरातील भगवान पाटील व सांगोला येथील राजाराम ढोले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर लातूरच्या सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनांनंतर या सर्वच शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. जनगणना करणाऱ्या प्रगणकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, तसेच कुटुंबीयांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी, अशी मागणी कोल्हापुरातील खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे. याविषयीचे निवेदन या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed