खासगी बस – दुचाकीच्या धडकेत 4 तरुण ठार:परभणी – पाथरी महामार्गावर रात्री उशिरा घडली घटना; सर्व मृत तरुण मानवतचे
![]()
परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खासगी बस व दुचाकीच्या झालेल्या एका अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे मानवतचे रहिवासी होते. त्यामुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएल 01 बी 1374 या क्रमांकाची खासगी बस शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास परभणीहून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसने परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील राहुल जिनिंगपुढे एमएच 22 बीबी 4724 क्रमांकाच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात दुचाकीवरील चारही तरूण जागीच ठार झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचाही अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघाताचा आवाज ऐकूण स्थानिक नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मानवत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर, पोलिस उपनिरीक्षक किसन पतंगे, प्रमोद देवकते, शीतल बोर्डे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी घेतील. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मृत व जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात ठार झालेले चारही तरुण मानवत शहरातील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी रात्री दुचाकीवरून कुठेतरी जात होते. अपघातामुळे सुरुवातीला त्यांची ओळख पटवणे अवघड झाले होते. पण नंतर ते मानवतचेच असल्याचे स्पष्ट झाले. शुभम आप्पाराव दहे (30), विष्णू गोरे (28), प्रल्हाद अशोकराव कुटे (29) व नवनाथ श्यामराव जाधव (38) अशी मृतांची नावे आहेत. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पण पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून ती पूर्ववत केली. मानवत पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या आवारात मृतांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच गावातील चार जणांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याने मानवत शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा… उन्हाचे चटके, आश्वासनांचे फुगे अन् मराठा समाजाची घुसमट:आंदोलन, आश्वासन, माघार या चक्रव्यूहात अडकले मनोज जरांगे; समाजात संताप
मराठा आरक्षणाच्या लढ्याची कहाणी आता एखाद्या ठराविक पटकथेसारखी वाटू लागली आहे. पहिला अंक – मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन; दुसरा अंक – सरकारचे शिष्टमंडळ; तिसरा अंक – चर्चा व आश्वासन; चौथा अंक – आंदोलन मागे; आणि 5 वा अंक – पुन्हा तेच प्रश्न, तीच निराशा. हे चक्र इतक्या वेळा फिरले आहे की, आता मराठा समाजातील एक मोठा वर्ग निराश झाला आहे. सरकारवरच नव्हे, तर या संपूर्ण प्रक्रियेवर. आता पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी धगधगत आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात जरांगे पाटील आंदोलनाला बसले आहेत. आपले शरीर थकले असले तरी इरादा कायम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणि इकडे राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा त्यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले आहे. आता चर्चा होईल, आश्वासन मिळेल, जरांगे माघारी जातील असे गृहीत धरले जात आहे. पण यात पुन्हा एक प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे यावेळी तरी काही वेगळे घडेल का? वाचा सविस्तर
