संभाजीनगर आता सुरक्षानगर:छत्रपती संभाजीनगरमधील कंपन्या भारतीय सैन्यदलाच्या दिमतीला, मिसाइल लाँचरसाठी इलेक्ट्रिक मोटर, ड्रोनचाही पुरवठा

0
new-project-2026-05-29t072345382_1780019723.jpg




केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ देत छत्रपती संभाजीनगर शहर देशातील एक प्रमुख डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे संरक्षण दलासाठी शस्त्रास्त्र निर्मितीची नगरी म्हणून वेगाने उदयास येत आहे. बदलत्या युद्धजन्य परिस्थितीत भारताचे आत्मनिर्भरतेचे धोरण स्थानिक उद्योगांना मोठी चालना देणारे ठरले आहे. सध्या शहरातील लहान-मोठ्या ७० ते १०० प्रमुख उद्योगांमधून थेट भारतीय सैन्यदल, नौदलासाठी अत्यंत संवेदनशील व उच्च तंत्रज्ञानावर आधारित सुट्या भागांचे आणि उपकरणांचे उत्पादन केले जात आहे. याशिवाय लघुउद्योगांमधूनही सुटे भाग प्रमुख कंपन्यांना पुरवण्यात येत आहेत. डिफेन्स ड्रिव्हन मॅन्युफॅक्चरिंगसाठी (संरक्षण केंद्रित उत्पादन) शहराची सध्याची औद्योगिक इकोसिस्टिम अत्यंत पूरक ठरली आहे. गेल्या दहा वर्षांत स्थानिक लघू, मध्यम उद्योगांनी संरक्षण क्षेत्राच्या गरजेनुसार स्वतःमध्ये तांत्रिक बदल घडवून आणले. त्यामुळे ते थेट डिफेन्स व्हेंडर तसेच भारताच्या मोठ्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या जागतिक पुरवठा साखळीचे अधिकृत सदस्य बनले आहेत. येथे तयार होणारे अद्ययावत सुटे भाग देशांतर्गत उत्पादनासोबतच मोठ्या कंपन्यांमार्फत थेट लष्कराला पुरवले जातात. यामध्ये टँक तसेच युद्धपोतामध्ये वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक कंपोनंट आणि सर्व्हिलन्स ड्रोनचा समावेश आहे. स्टार्टअपची थेट भारताच्या युद्धभूमीपर्यंत ड्रोन भरारी सिलिकॉन व्हॅली किंवा बड्या संरक्षण प्रयोगशाळांना मागे टाकत, जालन्यातील स्टार्टअपने लष्कराच्या युद्धभूमीपर्यंत मजल मारली. छत्रपती संभाजीनगरमधील संस्था मॅजिक इन्क्युबेटरच्या माध्यमातून सुरू झालेल्या या स्टार्टअपच्या प्राइम एअरोस्पेस या स्वदेशी कंपनीने भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडला अत्याधुनिक ड्रोन आणि पाळत ठेवणारी यंत्रणा पुरवली. संरक्षण क्षेत्रात मराठवाड्याचा डंका वाजवला. “प्राइम’तर्फे विकसित पाळत ठेवणारे आणि पेलोड/दारूगोळा टाकणारे ड्रोन प्लॅटफॉर्म्स विविध फॉर्मेशन्समध्ये तैनात करण्यात आले आहेत. शहरातील उद्योग जागतिक बाजारपेठेला जोडले जाणार गेल्या दशकभरात छत्रपती संभाजीनगरमधील संरक्षण क्षेत्रातील वाढती क्षमता पाहून तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, माजी वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, ‘डिफेन्स कॉरिडॉर’ उभारणीला गती दिली. यामुळे शहरातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडले जाणे अधिक सोपे होणार आहे. लष्कर, नौदल, हवाई दलासाठी सुटे भाग शहरामध्ये नौदल, लष्कर, हवाई दलाला आवश्यक असलेले सुटे भाग तयार करण्यात येतात. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्येही सैन्याला आवश्यक असलेले सुटे भाग तयार केले जातात. सैन्याला सुटे भाग पुरवणाऱ्या थेट तसेच साखळी स्वरूपात पुरवठा करणाऱ्या कंपन्या शहरात आहेत. यामध्ये महिंद्रा, भारत फोर्ज, एल अँड टी तसेच रिलायन्सला पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. आमच्याकडे प्रामुख्याने नौदलातील जहाजांसाठी वापरण्यात येणाऱ्या शॉक ग्रेड मोटर्स तसेच सैन्यदलातील टँक मिसाइल लाँचर्समध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्सची तसेच सर्व्हो मोटर्सची निर्मिती करण्यात येते. -विवेक हंबर्डे, एमडी, प्रांशू इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड शहरातील उद्योगाकडून संरक्षण दलाला सुट्या भागांचा पुरवठा डिफेन्स ड्रिव्हन मॅन्युफॅक्चरिंगसाठी शहरात सध्या पूरक इकोसिस्टिम आहे, त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून विविध स्तरांवर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचा पुढाकार घेतला जात आहे. शहरातील लहानमोठ्या उद्योगांमधून संरक्षण दलासाठी पुरवण्यात येणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती होत आहे. हे सुटे भाग प्रमुख कंपन्यांना व संरक्षण दलाच्या आस्थापनांना पुरवले जातात. आशिष गर्दे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल
1. मजबूत औद्योगिक पाया
छत्रपती संभाजीनगरची आधी ऑटोमोबाइल आणि आता ईव्ही हब म्हणून ओळख होत आहे. येथे अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी उत्पादनाचा मोठा पाया असल्यामुळे शहराची निवड. 2. शहर मोबिलिटी हब
संरक्षण दलासाठी सुटे भाग निर्मितीची लघु, मध्यम उद्योगात क्षमता आहे. नवीन तंत्रज्ञानावर भर देणारी, परदेशात शिक्षित उद्योजकांच्या पिढीमुळे शहराची ओळख मोबिलिटी हब होत आहे. 3. उत्तम कनेक्टिव्हिटी
संभाजीनगर रस्ते आणि हवाई मार्गांनी देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. पुणे-संभाजीनगर या प्रस्तावित एक्स्प्रेसवेमुळे संरक्षण उत्पादनांचा पुरवठा अधिक जलद होणार आहे. 4. राज्य शासनाचे नियोजन
पुणे-अहिल्यानगर-संभाजीनगर डिफेन्स कॉरिडॉर विकसित होत आहे. यामध्ये प्रामुख्याने लघु, मध्यम उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मितीचे राज्य सरकारचे धोरण व नियोजन आहे. 5. एकत्रित लॅबची निर्मिती शहरामध्ये मॅजिकसारख्या औद्योगिक संस्थेद्वारे संचलित स्टार्टअप इन्क्युबेटर आणि संरक्षण विभागाने एकत्र येत निर्माण केलेली लॅबमध्ये सध्या ९ स्टार्टअपसाठी काम सुरू आहे.
नाशिक सुखोई, मिगची नवी बांधणी, क्षमता अपग्रेडेशनही नाशिकध्ये एचएएलचा मोठा विमान निर्मिती प्रकल्प असून येथे सुखोई आणि मिग लढाऊ विमानांची नवीन बांधणी, क्षमता अपग्रेडेशन, आणि देखभाल-दुरुस्ती केली जाते, याशिवाय येथे इतर विमानांचे लँडिंग गिअर्स बनवण्याची सोय आहे. तसेच खाजगी कंपन्यादेखील संरक्षण सामग्रीचे सुटे भाग नाशिकमध्ये तयार करतात. यामुळे नाशिक शहर आणि परिसरदेखील भारताच्या संरक्षणात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहे. अहिल्यानगर भारत तोफगोळा प्रकल्पांमुळे संरक्षण निर्यातदार अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे निबे समूहाद्वारे ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स’ उभारण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून हा प्रकल्प २०० एकरांवर विस्तारलेला आहे. प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. या प्रकल्पांतर्गत वार्षिक ५ लाख तोफगोळ्यांच्या (आर्टिलरी शेल) विक्रमी निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे भारत देश मोठा संरक्षण निर्यातदार बनणार आहे. पुणे संरक्षण उत्पादनाचे केंद्र, प्रगत शस्त्रास्त्रांची निर्मिती प्रस्तावित डिफेन्स कॉरिडॉरमध्ये पुणे मध्यवर्ती भूमिकेत आहे. हिंजवडी आणि भोसरी एमआयडीसी परिसरातील शेकडो एमएसएई कंपन्या संरक्षण दलाच्या पुरवठा साखळीत महत्त्वाचा भाग आहेत. भारत फोर्ज निर्मित प्रगत तोफा, बख्तरबंद वाहने लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट होत आहेत. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स, एल अँड टीसारख्या कंपन्यांमार्फत क्षेपणास्त्रांचे सुटे भाग, रडार यंत्रणा, युद्धनौकांचे सुटे भाग पुण्यात तयार होत आहेत. जालना स्टील सिटीची आता ड्रोन सिटी अशीही ओळख प्राइम एरोस्पेस कंपनी पुढील ५ वर्षांत ड्रोन निर्मिती उद्योगात ४०० कोटींची गुंतवणूक करेल. यामुळे जालना स्टील सिटीची ड्रोन सिटी अशीही ओळख होईल. केवळ ड्रोनच नव्हे, तर शत्रूच्या ड्रोनला हवेतच नष्ट करणारे ‘अँटी-ड्रोन जॅमर्स’, इंटरसेप्टर्सही विकसित केले आहेत. सध्या वर्षाला ६,००० ड्रोन निर्मिती क्षमता आहे. सरकार, शेतकरी, सैन्य दलाचा विश्वास आम्ही तंत्रज्ञानातून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रद्युम्न मानधनी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed