बकरी ईद सप्ताहात 'अंनिस'चे रक्तदान शिबिर:एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांच्या उपस्थितीत 38 दात्यांचे रक्तदान
![]()
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अमरावती आणि बडनेरा शाखेच्या वतीने ‘मुक्या प्राण्यांची कुर्बानी न देता, मानवतेसाठी रक्तदान करूया’ या सामाजिक संदेशासह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. बकरी ईद / ईद-उल-अजहा सप्ताहातील हा उपक्रम बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी (इर्विन दवाखाना) येथे पार पडला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता ३८ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला. या शिबिराचे मुख्य आकर्षण ‘वन लेग वंडर ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने होते. त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाने उपस्थित युवकांना जिद्द आणि समाजसेवेची प्रेरणा दिली. शिबिराची सुरुवात स्वतः अशोक मुन्ने, वैभव भोंडे, सचिन खोब्रागडे आणि रेहमान शहा यांनी रक्तदान करून केली. यानंतर अनेक नवयुवकांनी आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान करत आपले कर्तव्य बजावले. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल लेखिका व समाजसेविका रजिया सुलताना, प्रेरणादायी कार्याबद्दल एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने आणि रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे यांना सन्मानित करण्यात आले. शिबिरात रक्तदात्यांना आणि उपस्थितांना संविधान आणि पर्यावरण जनजागृती विषयक पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथींना ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक भेट देण्यात आले, तर सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. सतीश तराळ, प्रमोद कोळमकर, मा. अजय साखरे, सुभाष गौरखेडे, विजय डवरे, मा. मो. अफसर, रेहमान शहा, वि.दा. पवार, हर्षा सगणे, विजया घोडेस्वार आणि सर्पमित्र मोनाली सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार आणि रक्तपेढी प्रमुख डॉ. आशिष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, समुपदेशक योगेश पानझाडे, परिचारिका संगीता गायधने आणि गजानन इंगळे यांनी तांत्रिक सहकार्य केले. सचिन खोब्रागडे, दिलीप लाडे, मंजू वासनिक, विजया करोले यांच्यासह महा. अंनिस अमरावती, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, संविधान जागर अभियान आणि समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
