खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात:चार गाड्या एकमेकांवर आदळल्या, नांदेडमध्ये घडली घटना
![]()
शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ‘शिवसंवाद यात्रे’दरम्यान त्यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ताफ्यातील सर्व कार्यकर्ते आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे जात असताना हा अपघात झाला. ताफा जात असतानाच समोरून अचानक एक वाहन आले, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ताफ्यातील चार गाड्या एकामागोमाग एक एकमेकांवर आदळल्या. या गाड्यांमध्ये शिवसेनेचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रवास करत होते. धडक जोरात असली तरी सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, गाड्यांच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक अपघाताच्या सावटातून सावरत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपला नियोजित दौरा सुरू ठेवला. त्यांनी नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. प्रत्येक गावात आणि घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच मैदानात उतरावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ‘बूथ’ स्तरावर ताकद वाढवण्याचे आदेश बैठकीत संघटनात्मक मजबुतीवर भर देताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, “शिवसेना केवळ एक राजकीय पक्ष नसून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे. ही ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण क्षमतेने कामाला लागावे.” याबैठकीमध्ये एसआयआर (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करणे आणि नवीन मतदार नोंदणीवर भर देणे, युवा मतदारांशी आणि सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद वाढवणे, प्रत्येक बूथवर बीएलए (BLA), शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी सक्रिय राहून संघटन अधिक मजबूत करणे, ग्रामीण भागात पक्ष विस्तारासाठी सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून स्थानिक प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये विजयाचा गुलाल उधळायचा असेल, तर सर्वांनी स्वतःला झोकून देऊन काम करणे आवश्यक असल्याचे मत श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या दौऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, अपघातातून सर्वजण सुखरूप बचावल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
