पुण्यात विविध अपघातांत तीन जणांचा मृत्यू:पाषाण, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवडा परिसरात घटना
![]()
पुणे शहरात विविध अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाषाणमधील सूस रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरात या घटना घडल्या. या अपघातांमध्ये एका सहप्रवाशाचा, एका रिक्षाचालकाचा आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे. पाषाण-सूस रस्त्यावर गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात प्रसाद सुनील शेकडे (वय २०, रा. बोईसर, पालघर) या सहप्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार सक्षम चिंतेश्वर बोराडे (वय १९, रा. बीड) आणि अमित धोडिंबा साळुंखे (वय २०, रा. बीड) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील सूर्यवंशी यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्षम, प्रसाद आणि अमित हे सूस रस्त्याने जात असताना ब्रह्मकुमारी राजयोग केंद्रासमोर सक्षमचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी गतिरोधकावरून घसरून पदपथावर आदळली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान प्रसादचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल सक्षमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मांढरे तपास करत आहेत. येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर वाहनाच्या धडकेत रिक्षाचालक विजय घोरपडे (वय ६०, रा. येरवडा) यांचा मृत्यू झाला. त्यांची रिक्षा बंद पडल्याने ते रस्त्यावर उतरले होते, त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या घोरपडे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी घोरपडे यांची मुलगी सायली (वय ३१) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जराड या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. लोणी काळभोर परिसरातील बोरकर वस्तीजवळ रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या पादचारी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस शिपाई अतुल रायबोले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. बोराटे पुढील तपास करत आहेत.
